ताज्या बातम्या

जे आपले नव्हतेच त्यांच्याबद्दल त्रागा कशाला ?- योगेश वसंत त्रिवेदी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सचिन अहिर हे काही क्षणात एकनाथ शिंदे यांच्या कळपात सामील झाले आणि विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर टुण्णकन जाऊन बसले. वरळी मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी सचिनभाऊंनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये परिश्रम घेतले. मुळात या वरळी मतदारसंघातून सुनील शिंदे हे विधानसभेवर निवडून येत होते. शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत आलेल्या सचिनभाऊंसाठी मातोश्री ने पायघड्या घातल्या. त्यांना शिवसेना उपनेते केले. त्यांनी दोन वेळा आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत सहकार्य केले. अगदी चुलत भाऊ अमित स्वरराज ठाकरे यांच्या विरोधात विजयश्री खेचून आणली. त्यामुळे सचिनभाऊंबद्दल मनाच्या कोपऱ्यात एक प्रकारचा ओलावा असणे साहजिक आहे. २०१९ नंतर महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. भारतीय जनता पक्षाच्या छावणीत अनेकांना आश्रय घेतला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस असे पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाच्या चटई क्षेत्रफळात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. भ्रष्टाचारमुक्त भारत आणि भ्रष्टाचार युक्त भाजप, कॉंग्रेस मुक्त भारत आणि कॉंग्रेसयुक्त भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली. ज्या महाशक्तीने शिवसेना फोडली त्याच महाशक्तीच्या जोरावर एकेक करून शिंदे यांचा गट वाढू लागला. आतापर्यंतच्या फोडाफोडीत सचिनभाऊ अहिर यांच्या नावाचा समावेश झाला. त्याबरोबर आदित्य ठाकरे यांनी त्रागा केला. २०१९ पासून नव्हे तर आधीपासून कोणी कोणी मातोश्रीची साथ सोडली त्या नावांवर नजर टाकली तर जे आपले नव्हतेच ते आपल्यापासून वेगळे झाले त्यामुळे काय फरक पडतो. प्रकाश सुर्वे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष होते आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतांना भुजबळ ब्रिगेडचे म्हणून ओळखण्यात येत होते. प्रताप सरनाईक आणि संजय दीना पाटील हे दोघे कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी विभागात (नॅशनल स्टुडंट्स युथ कॉंग्रेस) एकत्र होते. संजय दीना पाटील यांचे वडिल हे कॉंग्रेसचे तसेच कामगार नेते होते. प्रताप सरनाईक यांनी अजितदादांच्या निष्ठेसाठी प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात लीलावातून भारी किंमतीचे घड्याळ घेऊन ते अजितदादा पवार यांना भेट दिले होते. ही मंडळी राजकीय लाभासाठी कुठेही जाऊ शकतात. ते ज्या पक्षातून आपल्याकडे आले तेंव्हा ज्या पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली त्या पक्षासाठी ते गद्दारच म्हणावे लागतील. आपल्याकडे येऊन शिवबंधन बांधले म्हणजे ते आपल्याबरोबर निष्ठावंत असे होऊ शकतात ? १९ जून १९६६ किंवा त्या काळापासून जे वर्षानुवर्षे आपल्याबरोबर आहेत आणि आपल्या एका शब्दाखातर पदाची लालसा ठेवल्याशिवाय काहीही करु शकतात तेच खरे निष्ठावंत. त्यांना शिवबंधन बाधण्याचीही आवश्यकता नाही. आजही वर्षानुवर्षे उपनेतेपदावर राहून किंवा पदाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी खस्ता खाणारे विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, रविंद्र मिर्लेकर, दिगंबर कांडरकर, दत्ता दिवेकर, अरुण दुधवडकर अशी असंख्य कार्यकर्ते मंडळी पक्षासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. यांना जपण्याची गरज आहे. मुंबई सह महाराष्ट्रात अशी असंख्य निष्ठावंत मंडळी आहेत. सुनील शिंदे आपल्याबरोबरच आहेत परंतु भारतीय कामगार सेनेत अणि उपनेतेपदाचे मानाचे पान सचिन अहिर यांच्या वाट्याला. १९९९, २००४ आणि २००९ असे तीन वेळा विधानसभेवर शरद पवार यांच्या पक्षातर्फे निवडून आलेल्या सचिनभाऊ अहिर यांचा २०१४ साली शिवसेनेच्या निष्ठावंत सुनील शिंदे यांनी पराभव केला होता. प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे यांच्या कळपात सामील झाले तेंव्हा आदित्य ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले. तसे आता सचिनभाऊ अहिर जाताच त्रागा केला. अहो सरकार, जे आपले नव्हतेच त्यांच्यासाठी एवढा त्रागा करण्याची अजिबात गरज नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकटाच्या काळात सुषमा अंधारे यांच्यासह अनेक जण आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य मानले त्यांना जपण्याची आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याची गरज आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणतेही पद घेतले नाही उलटपक्षी लोकांना त्यांनी भरभरुन पदे दिली. १४ मार्च १९९५ रोजी डॉ मनोहर गजानन जोशी यांनी अरबी समुद्राच्या आणि अथांग जनसागराच्या साक्षीने शिवशाही सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणून वर्तमानपत्रात ९ अग्रलेख लिहिल्याचा विक्रम सांगण्यात येतो परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कोणतेही पद घेतले नाही. रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न ही सच्ची समाजवादी संकल्पना मांडली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र घेऊन शिवसेना चालवली. एकचालकानुवर्ती संघटना म्हणून जगाच्या पाठीवर विक्रम प्रस्थापित केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे, तद्वतच शिवसेनेचेही हीरक महोत्सवी वर्ष आहे. न्या. उदय लळित, न्या. धनंजय यशवंतराव चंद्रचूड, न्या. भूषण रामकृष्ण गवई असे सरन्यायाधीश होऊन गेले. आता सूर्यकांत हे सरन्यायाधीश आहेत. चार वर्षे झाली सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कुणाची हा खटला पडून आहे. चार वर्षांपूर्वी जर पक्षांतरप्रतिबंधक कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असता तर आज हे भयानक राजकीय चित्र पाहण्याची वेळ आली नसती. अजूनही वेळ गेलेली नाही. न्या सूर्यकांत यांनी तातडीने फैसला करावा आणि संभाव्य राजकीय बाबींना आवर घालण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन या निमित्ताने केले तर ते अनाठायी होणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत म्हणणाऱ्या अनेकांनी मातोश्रीची साथ सोडली, अनेक जण पदांसाठी शिवसेनेत आले आणि पदे उपभोगत बाहेर पडले. पक्षनिष्ठेमुळे (अपमानित होऊनही) डॉ. मनोहर जोशी हे लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. ‘मातोश्री’चा उंबरठा ज्यांनी पाहिला नाही आणि ज्यांना ठाण्याचा टेंभी नाका माहित नाही, असे आता बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्याच्या गोष्टी करीत आहेत. नशीबवान आहेत बाळासाहेब आणि दिघे साहेब (हेचि फल काय मम तपाला असे या महान विभूती स्वर्गात म्हणत असतील). परमपूज्य बाळासाहेब आणि दिघे साहेब, यांना माफ करा. तूर्तास इतकेच ! जय महाराष्ट्र !!

– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

Scroll to Top