ताज्या बातम्या

मतदार यादी विशेष पुनरीक्षण सुरू; बीएलओंना सहकार्य करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

नवी मुंबई, ३० जून : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. या मोहिमेला नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांतील ९ लाख १९ हजार ६९७ मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. यासाठी ३८ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलओ प्रत्येक मतदाराला गणनापत्र (Enumeration Form) देऊन आवश्यक माहिती भरून घेतील.

ज्यांचे नाव २०२४ च्या मतदार यादीत आहे, मात्र २००२ च्या मतदार यादीत नसण्याची शक्यता आहे, त्यांनी आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या २००२ च्या मतदार यादीतील तपशील ECI NET ॲप किंवा Electoral Search संकेतस्थळावरून शोधून गणनापत्रात नमूद करावा. ही माहिती उपलब्ध असल्यास अतिरिक्त पुरावे सादर करण्याची गरज भासणार नाही.

५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती दाखल करता येणार असून, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

“कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही,” या उद्दिष्टानुसार नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून गणनापत्र भरून द्यावे आणि त्याची पोहोच घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Scroll to Top