ताज्या बातम्या

अरुण रंगराव मोरे : पत्रकारांचे आधारस्तंभ !

विशेष लेख : अरुण मोरे हे जळगावचे वयोवृद्ध पत्रकार. साप्ताहिक संपदकांचे मार्गदर्शक व तमाम पत्रकारांचे आधारस्तंभ आहेत. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या साप्ताहिकांच्या संपादकांना हर तऱ्हेची मदत करण्यात हयात घालवलेला हा पत्रकार आहे. नवे साप्ताहिक सुरु करणे, असलेल्या साप्ताहिलास आर एन आय नंबर मिळवून देणे, शासनाच्या मान्यता यादीवर आणणे, अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देणे, अशी एक ना अनेक कामे ते सातत्याने करून देतात. आज साप्ताहिक प्रतिशाली ते सुमारे ३५/ ४० वर्षे अखंडपणे चालवत आहेत. एवढी प्रदीर्घ काळ पत्रकारिता करणारे फार थोडे पत्रकार जळगाव जिल्ह्यात उरले आहेत.
. सतत /कायम संपर्क ठेवणे हे अरुण रावांचे वैशिष्ट्यआहे. पत्रकार संघटनांचे आजी किंवा माजी पदाधिकारी असोत अधिकारी असोत, सर्वांशी संपर्क ठेवणे, मिळालेली माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे काम नि :स्वार्थपणे ते करत असतात. सेवाभावी पत्रकार या पुरस्कारास ते पात्र आहेत. असा पुरस्कार त्यांच्या साठी सुरु करायला हरकत नसावी. ज्येष्ठ पत्रकार असूनही त्यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अद्याप मिळू शकलेला नाही. पात्रता निकषात ते बसतात. असे अनेक पत्रकार पात्र असूनही केवळ तांत्रिक खुसपटे काढली आहेत. त्यांचेवर अन्याय झाला आहे.
कै. पंढरीनाथ सावंत कार्यकारी संपादक सा.मार्मिक यांना शासनाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार दिला. पण सन्मान योजना मंजूर केली नव्हती. दै.सामनाचे ज्येष्ठ उपसंपादक, माझे वैयक्तिक व सर्व पत्रकारांचे ‘गुरु’ जी उर्फ योगेश त्रिवेदी हे ज्येष्ठ पत्रकार असूनही, पत्रकारांसाठी लढणारे नेते असूनही त्यांना पत्रकार सन्मान योजना मिळण्यासाठी झगडावे लागले. अनेक पत्रकार घडवणारे सावंत आणि त्रिवेदीजी यांचे प्रस्ताव रखडले. सावंतांना शेवट पर्यंत हा सन्मान दिला गेला नाही. अरुण रंगराव मोरे बिचारे अजूनही रांगेतच आहेत. त्यांच्या अर्जाचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा अशी जाहीर विनंती मी करत आहे. त्यांचा उद्या १ जुलै रोजी ७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा प्रस्ताव मंजूर होवो आणि आयुष्याच्या संध्याकाळी तरी त्यांची इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा.
-एस.पी.कुळकर्णी, धरणगाव – जळगाव (हल्ली मुक्काम पुणे)
.

Scroll to Top