ताज्या बातम्या

शिवशाही प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना पुरस्कृत शिवशाही प्रतिष्ठान यांच्या वतीने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेनेच्या हिरक महोत्सवी (६० व्या वर्धापन) वर्षानिमित्त विशेष गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
शिवडी क्रॉस रोड परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यालयात शैक्षणिक साहित्य प्रदान करून तसेच स्थानिक लोकप्रिय खासदार, शिवसेना नेते व सचिव मा. अनिलभाऊ देसाई यांच्या अभिनंदनीय प्रमाणपत्राने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष तथा नायगाव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शाखेचे उपशाखाप्रमुख श्री. हरीश मोरे, महिला उपशाखासंघटक सौ. योगिता महिरे, युवाशाखाधिकारी रोहन सुरेश काळे, देवदास दिवेकर, जयवंत पेडणेकर, मास्टर शहानवाज यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top