ताज्या बातम्या

आणीबाणीच्या विरोधात भाजयुमो मुंबईची पदयात्रा व सायकल रॅली; युवकांनी घेतली लोकशाही रक्षणाची प्रतिज्ञा

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मुंबईतर्फे देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळा अध्याय मानल्या जाणाऱ्या २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात मुंबईतील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये पदयात्रा व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजपा मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या अभियानात हजारो युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेत लोकशाही रक्षणाचा संकल्प केला.
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते आणि नागरिकांना आणीबाणीच्या काळातील घटनांची माहिती देण्यात आली. तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेच्या रक्षणासाठी देशावर आणीबाणी लागू करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध आणले, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली आणि विरोधी मतांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिका भाजयुमोतर्फे मांडण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय मूल्यांच्या रक्षणाची विशेष प्रतिज्ञा घेतली. देशावर पुन्हा कधीही संविधानविरोधी व लोकशाहीविरोधी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सदैव सजग राहण्याचा निर्धार करण्यात आला.
भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह म्हणाले, “२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस होता. सत्तेच्या संरक्षणासाठी संविधान आणि लोकशाहीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाखो लोकशाही सेनानींना तुरुंगात टाकण्यात आले, प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात आला आणि नागरिकांचे अधिकार हिरावून घेण्यात आले. देशातील युवा पिढीला हा इतिहास माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणतेही सरकार नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे धाडस करणार नाही.”
मुंबईतील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये आयोजित या अभियानातून युवकांनी संविधान, लोकशाही आणि राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचा संदेश दिला. तसेच आणीबाणीसारखा काळा अध्याय देश कधीही विसरणार नाही आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी लोकशाही, संविधान आणि राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला.

Scroll to Top