ताज्या बातम्या

भिक्षेकरी गृह – सातारा शहर मार्गावर उपाययोजना करण्याची मागणी..

सातारा(अजित जगताप) : पावसाळ्याच्या आगमनाला काही दिवस बाकी असतानाच रस्ते अपघातामध्ये घट व्हावी. लोकांना सुरक्षित प्रवास करण्यात यावा. यासाठी तातडीने उपाय योजना राबवणे गरजेचे आहे. सध्या सातारा शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या जरंडेश्वर नाका नजीक नाका येथील भिक्षेकरी गृह रस्त्यावर अपघात होत आहेत. याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवसेना सेलचे पदाधिकारी अमोल पाटोळे व रिपब्लिकन सेनेचे अशोक भिसे यांनी या अपघात स्थळाला भेट देऊन उपाययोजना सुचवली आहे.

भिक्षेकरी गृह आणि वाढे फाटा परिसरातील रस्त्यावर यापूर्वी अपघात झाल्याने पत्रकार व माजी सैनिकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्ता अरुंद असून सुद्धा कोणतीही उपाययोजना राबवण्यात आलेली नाही. विद्युत खांब उंचावर असून त्याच्या भोवती झाडाच्या फांद्या आहेत. या परिसरात समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच काही वाहन चालक याच भागात ओव्हरटेक करतात. हे पूर्ण धोकादायक आहे. या भागातच अरुंद रस्ता असल्यामुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अपघात झाल्यानंतर अनेक जण त्याचे विश्लेषण करतात. पोलीस अपघाताच्या जागेचा ‘घटनास्थळ पंचनामा’ आणि वाहनांचा ‘मोटार वाहन निरीक्षक अहवाल’ तयार करतात. तपास पूर्ण झाल्यावर पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र सादर करतात. या अपघाताचा खटला सातारा जिल्हा न्यायालयात चालवला जातो. मोटर अपघात न्यायाधीकरण व अपघात विमा भरपाई यासाठी लढा द्यावा लागतो. परंतु ज्याचे प्राण गेलेले आहेत ते पुन्हा आणता येत नाहीत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग एन एच ४८ सातारा शहरातून जात असल्याने भिक्षेकरी गृह, वाढे फाटा आणि लगतचा परिसर हा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. सातारा आर.टी.ओ. आणि वाहतूक शाखेच्या अहवालानुसार, वाढे फाटा, अजंठा चौक, मोळाचा ओढा आणि खंबाटकी घाट परिसर हे गतिमान वाहनांमुळे अपघातांचे मुख्य केंद्र बनले आहे. रिक्षा व वडापा गाडीमध्ये ज्यादा प्रवासी घेऊन जाणे. वाहनांचा वेग वाढवणे. हे सुद्धा अपघाताचे कारण आहे.
सातारा शहरात प्रवेश करताना वाहनांचा वेग जास्त असणे, जोड रस्ता येणारी अनियंत्रित वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गांचा अभाव यामुळे या भागात अपघात घडतात. सातारा पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. असा दावा असला तरी अपघाताचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा आहे.

या ठिकाणी गतिरोधक व रिफ्लेक्टर आणि सूचना फलक दर्शनी भागात दिसत नाहीत.
वनविभागाने लावण्यात आलेली झाडे वाळून गेलेली आहे. त्या झाडाच्या बुंध्याला सिमेंट ने प्लास्टर केले आहे. दृश्यमानता आणि इशारा यंत्रणा रिफ्लेक्टर्स आणि दिशादर्शक फलक: रात्रीच्या वेळी चालकांना वळण स्पष्ट दिसावे यासाठी झाडाच्या फांद्या छाटून टाकल्या पाहिजेत. अपघात प्रवण क्षेत्राचे मोठे इशारा फलक या भागात रस्त्याच्या कडेला लावले पाहिजेत. रात्रीच्या अंधारात विद्युत खांबावरील प्रकाश आजूबाजूच्या झाडाच्या फांद्यांमुळे रस्त्यावर येतच नाही.सातारा शहरातील ‘भिक्षुक गृह’ परिसरामध्ये किंवा जवळ निश्चितपणे घडलेल्या अपघातांची कोणतीही स्वतंत्र, अधिकृत किंवा सविस्तर आकडेवारी सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. तरीही मनुष्यजीविताची हानी होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे हे रस्ते विकास महामंडळ व नगरपालिकेचे काम आहे असे श्री भिसे व पाटोळे यांनी स्पष्ट केले आहे.

————————————————–
फोटो– भिक्षेकरी ग्रह के सातारा शहर रस्त्याची पाहणी करताना शिवसेना व रिपब्लिकन सेना पक्षाचे पदाधिकारी (छाया- अजित जगताप सातारा)

Scroll to Top