ताज्या बातम्या

कर्मवीरांच्या विचारांचा खरा वारसदार ठरले रामशेठ ठाकूर; रयतसाठी तन-मन-धन अर्पण

सातारा(विजय जाधव) : “गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न जपणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्मवीरांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत,” असे गौरवोद्गार खासदार शरद पवार यांनी काढले.

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार आणि जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास अध्यक्ष खासदार शरद पवार, आमदार विश्वजित कदम, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, मधुकर भावे, चंद्रकांत दळवी, ॲड. भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील, अरुण कडू पाटील, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना रामशेठ ठाकूर म्हणाले, “गेली ५२ वर्षे माझे जीवन रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे माझे दैवत असून संस्थेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. रयतमुळेच माझे आयुष्य घडले आणि रयत सेवक म्हणून जगण्याचा अभिमान आहे. ‘रयत माऊली’ हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे.”

आमदार विश्वजित कदम यांनी रामशेठ ठाकूर यांच्या शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलल्याचे सांगितले. तर विचारवंत मधुकर भावे यांनी कोकणासह दुर्गम भागात शिक्षणासाठी तन-मन-धन अर्पण करणारे रामशेठ ठाकूर हे हजारो विद्यार्थ्यांचे पोशिंदा असल्याचे नमूद केले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी कमवा व शिका योजनेतून घडलेल्या विद्यार्थ्यापासून मॅनेजिंग कौन्सिल सदस्यापर्यंतचा रामशेठ ठाकूर यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी रयत शिक्षण संस्थेला १०० कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्याची माहिती दिली.

राज्यभरातील रयत सेवक, शिक्षणप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार सोहळा शिक्षणसेवा, दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

Scroll to Top