नवी मुंबई : तीन दिवसांच्या शटडाऊननंतर पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर गढुळ पाण्याच्या येत असलेल्या तक्रारी आता अत्यंत कमी झाल्या असून पूर्ववत पाणीपुरवठा होत असल्याचे अभिप्राय लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून प्राप्त होत आहेत अशी माहिती देत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घणसोली व ऐरोलीच्या काही भागात आणि दिघा विभागात एमआयडीसीचे पाणी येत असल्याने याही पाण्याची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी पाहणी करीत असल्याचे सांगितले.
मोरबे धरणापासून नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीपर्यंत सर्व ठिकाणच्या पाणी नमुन्यांच्या चाचणीची प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन महापौर व उपमहापौर तेथील स्थानिक नगरसेवकांसह आठवडाभरापासून पाहणी करीत असून आज त्यांनी ऐरोली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देत घणसोली, ऐरोली व दिघा विभागातील नगसेवक व नागरिकांशी संवाद साधत जलस्थितीची तपासणी केली व घराघरांतून संकलित केलेल्या तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आणलेल्या पाणी नमुन्यांची समक्ष चाचणी केली. यावेळी एफ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.ललिता मढवी, नगरसेवक श्री.मनोज हळदणकर, श्री.शिवाजी खोपडे, श्रीम.अंजना म्हात्रे, श्रीम.रेश्मा मढवी, श्रीम.श्रेया जिरगे, श्रीम.गौरी आंग्रे, श्रीम.चांदनी चौगुले, ॲड.अपर्णा गवते, श्री.बंडू केणी तसेच तसेच अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवकांनी एमआयडीसी मार्फत मिळणा–या पाण्याच्या शुध्दतेविषयी शंका उपस्थित केल्या. या अनुषंगाने महापौर महोदयांनी एमआयडीसी मार्फत प्राप्त होणा–या पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी करावी तसेच भोकरपाड्याच्या जलशुध्दीकरण केंद्राप्रमाणेच एमआयडीसीकडून प्राप्त होणा–या पाण्यासाठी लहान आकाराचे जलशुध्दीकरण केंद्र दिघा येथे बनवावे असे सूचित केले. त्यामुळे एमआयडीसीकडून आवश्यक तेवढा पाणीपुरवठा होत असल्याबाबत खात्री करता येईल तसेच तपासणी व योग्य प्रक्रिया केलेला शुध्द पाणीपुरवठा करता येईल असे सांगितले.
विशेषत्वाने गावठाण भागातील जलवाहिन्या अतिशय जुन्या झाल्या असून त्या ठिकठिकाणी गंजून त्याला छिद्रे पडल्याने बहुतांशी ठिकाणी या पाईपलाईन गटारांमधून गेलेल्या असल्याने दूषित पाणीपुरवठा होतो अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्या. झोपडपट्टी भागातही हीच स्थिती असल्याचेही म्हणणे मांडण्यात आले. याविषयी महापौर महोदयांनी या पाईपलाईन बदलून त्या नव्याने टाकताना गटारांच्या बाजूला स्वतंत्र कॅबिनेट डक्ट बनवावा आणि त्यामधून जलवाहिन्या टाकाव्यात जेणेकरून त्या स्वतंत्र राहतील असे सूचित केले.
सध्या मोरबे धरणात 71.16 मीटर इतकाच जलसाठा असून 14.94 टक्के इतके पाणी शिल्लक आहे. त्यामुळे इतर शहरांसारखी नवी मुंबईची भीषण स्थिती नसली तरी पुढे ती ओढावू नये याकरिता नागरिकांनी पाण्याचा आजपासूनच अत्यंत जपून वापर करावा असे आवाहन केले. यावर्षी पाऊस उशीरा येणार आणि नेहमीपेक्षा पर्जन्यमान कमी असणार असा हवामान खात्याचा अंदाज असून पाऊस कधी येणार हे ठाऊक नसल्याने जुलैपर्यंत पुरेल एवढा असलेला मोरबेतील पाणीसाठा काळजीपूर्वक वापरण्याची गरज महापौर महोदयांनी विशद केली.
अनेक नागरिकांकडून गाड्या धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय होत असून अनेकजण मोटारी लावून पाणी खेचत असल्याने इतरांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो ही वस्तुस्थिती उपस्थित नागरिकांकडून मांडण्यात आली. त्याचप्रमाणे बांधकाम साईटवर पिण्याच्या पाण्याचा वापर होतो तोही तात्काळ बंद करावा आणि त्यांना महानगरपालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द केलेले पाणी वापरण्याची सक्ती करावी अशाही सूचना नगरसेवकांमार्फत करण्यात आल्या. याबाबत पाहणी करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले.
वास्तविकत: ज्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली आहे अशा बांधकामांच्या ठिकाणी तेथील कामगारांसाठी महानगरपालिका पाणी कनेक्शन देत असते. मात्र त्याचा गैरवापर बांधकामासाठी करण्यात येतो अशा तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे महापौर महोदयांमार्फत निर्देशित करण्यात आले.
काल रात्रीपासून ऐरोली विभागात विजेचा पुरवठा नव्हता व हे नियमित होते आणि त्याचा परिणाम पाणीपुरवठा सेवेवरही होतो, त्यामुळे याबाबतही पुढाकार घ्यावा अशा प्रकारची विनंती करण्यात आल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि एमएसईडीसीएल विद्युत कंपनीचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल असे महापौर महोदयांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठा विषयक तक्रारींसाठी 1800222309 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला असून त्यावर नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे नागरिकांना आवाहन करतानाच तक्रारीच्या ठिकाणी आपले कर्मचारी पोहचून तक्रारीचे निवारण करतील व पाण्याची तपासणी करून त्याची माहितीही देतील असे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सांगितले.




