ताज्या बातम्या

आसगावात सुन्या सुन्या पाच घरात, विसावला आठवण हुंदका…

सातारा(अजित जगताप) : रायगडच्या पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी एक आठवड्यापूर्वी अपघात झाला. या अपघाताने आठ कुटुंबाचे स्वप्न भंगले. घरातील हासरी मैफिल शोकसागरात बुडाली. शुक्रवार हा घात वार ठरला. आठवडा झाला तरी अजूनही सांत्वन करणाऱ्यांची रीघ लागली आहे. साथ जियेंगे.. साथ मरेंगे.. दोस्ती निभावली पण, अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेले. सातारा तालुक्यातील आसगाव रस्त्यावरून जातानाच त्या सिमेंटच्या रस्त्यावरील कोरलेली जिवंत मित्रांची नावे आहेत . त्यातील पाच नावे आता कायमची चीरनिंद्रा घेत आहेत. असा भास होत आहे. आठवड्यापूर्वीच शुक्रवारी रात्री नऊ वाजता सर्वांचा निरोप घेताना आनंदाने निघालेले चेहरे अनेकांनी पाहिले. आणि तिसऱ्या दिवशीच घरी मृत्युदेह आणताना शेवटी चेहरे सुद्धा दिसले नाहीत.
आसगावचे बालपणीचे मित्र महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, मर्ढे गावातील उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे, वाहन चालक खटावचे संदीप काटकर अशा आठ जणांचा अक्षरशा बळी घेतला आहे. सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, माजी आ. सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमंतराव चवरे- पाटील, नातेवाईक असलेले पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पवार, त्याचबरोबर घडलेल्या घटनेमुळे सांत्वन करण्यासाठीआलेली कुमारी अंकिता अजित जगताप, कुमार इर्षा खरात व चिमुकला निर्वेद पवार यांच्यासह अनेक नातेवाईक आणि मित्रपरिवार व सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून सांत्वनासाठी येणारे लोक प्रत्येक घरातील दुःख पाहून हळहळत आहेत.
आस गावातून शुक्रवारी २२मे रोजी रात्री हसऱ्या चेहऱ्याने बागडणारे मित्र सहली साठी काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत बसले. तीच काळ रात्र ठरली. पाच मित्र आता हयातीत नसल्याने आसगावातील रस्ते सुनसान वाटत आहे. ज्या ठिकाणी धार्मिक विधी व अंत्यसंस्कार करण्यात आले. ती जागा सुद्धा मरण यातना भोगत असल्याचे भास होत आहे. एकमेकांचे मित्र असलेले सर्वजण आज अपघाताने निघून गेले असले तरी त्यांच्या घरातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहताना मन गलबलून जाते. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर शेजारी-नातेवाईक हे मदतीला धावतात. एकमेकांचे सांत्वन करतात. आसगाव मध्ये माणुसकीचा झरा वाहत असला तरी पाच घरामध्ये एकमेकांचे सांत्वन करताना आपलं दुःख सुद्धा झेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये उरलेली नाही. आपल्या लेकराच्या आठवणीने अजूनही काही मातांचे अश्रू डोळ्यातून ओघळत आहेत. तर काहींच्या डोळ्यातील आस अजूनही आहे. भाबड्या आईच्या हृदयात आपला मुलगा अचानक”” आई ”” असा हाक मारेल. अशी भाबडी समजूत शून्याकडे नजर लावून पाहिलेल्या डोळ्यात दिसत होती. सांत्वन करण्यासाठी संपूर्ण आस गाव व परिसरातील माता-भगिनी माणुसकीच्या नात्याने आठवड्यानंतरही भेटून दिलासा देत होत्या. आठवडा झाला तरी दुःखाच्या वेदना कमी झालेल्या नाहीत. या घरातील विझलेला दिवा पुन्हा माणुसकीने पेटवण्यासाठी व त्यांची चूल सुद्धा पेटली पाहिजे. यासाठी आता सरकारने त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत दाखल करून सरकार सोबत आहे. हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. मानवी कल्याणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. लाडकी बहीण योजना राबवली जाते. आता लाडक्या बहिणीला ओवाळणी देणारा भाऊ नसल्यामुळे शासनाने प्रयत्न करावेत. अशी माणुसकीच्या दृष्टिकोनातून मागणी होऊ लागलेली आहे. काही वेळेला शासकीय नियम शिथिल करून अनेकांना मदत झालेली आहे. आंबेनळी घाटातील अपघात हा मानवी चुकीमुळे झालेले नाही तर रस्त्याच्या कामामधील दुर्लक्षितपणा व निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मदतीचा अधिकार आहे. असे काही ना मनापासून वाटत आहे. शेवटी सर्व आठ जणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना डोळे आपोआप पाणावले जात आहेत. श्रद्धांजली शब्द सुद्धा कमी पडत आहे.
……………………………..———————————–फोटो- आसगाव ता. सातारा येथे नातेवाईकांचे सांत्वन करताना मान्यवर व ग्रामस्थ. (छाया- निनाद जगताप, सातारा)

Scroll to Top