ताज्या बातम्या

दुधडेवाडीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई; महिलांना पाणी आणण्यासाठी करावी लागते पायपीट

कराड (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील दक्षिण परिसरातील दुधडेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिला व वृद्ध नागरिकांना एक ते दीड किलोमीटर अंतर चालत जाऊन हंडाभर पाणी आणावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घराळवाडी, दुधडेवाडी आणि काटेकरवाडी या भागात दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाईची समस्या गंभीर बनते. या गावांसाठी अद्याप कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली नसल्याने ग्रामस्थांना स्थानिक बोअरवेल आणि विहिरींवरच अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायतीकडून २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे तसेच घराळवाडीत पाण्याचे एटीएम असल्याचे सांगितले जात असले, तरी
प्रत्यक्षात ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

खर्चाच्या दुधडेवाडीत पाण्यासाठी येवती धरणातून व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पिण्यासाठी गावातील एकमेव खाजगी बोअरवेलवर ग्रामस्थांचा आधार होता. ही बोअरवेल सध्या बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चौकट : खाजगी बोरवेल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला खर्च येणार नाही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्यानंतरच निधी देता येईल असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगितले आहे, मात्र तोपर्यंत तरी टँकरची व्यवस्था करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी ,
तुकाराम दुधडे ग्रामस्थ, दुधडेवाडी.

Scroll to Top