
म


ुंबई : “कधीकाळी जगासमोर याचकाच्या भूमिकेत दिसणारा भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी राष्ट्र म्हणून उभा आहे. गेल्या बारा वर्षांत देशाचा भक्कम विकासाचा पाया रचण्यात आला असून, आता भारत केवळ पुढेच जाणार आहे,” असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगल प्रभात लोढा, सुनील राणे, योगेश सागर, अमित साटम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा या विशेषांकातून घेण्यात आला आहे. देशातील विकासकामे, धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील बदल यांचे विस्तृत विश्लेषण या अंकात करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारने गरीब कल्याणाला प्राधान्य देत घरकुल, शौचालय, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीवर भर दिला. “२०१३-१४ मध्ये देशाचा जीडीपी १०३ लाख कोटी होता, तो आज ३५७ लाख कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्राचाही जीडीपी १३ लाख कोटींवरून ५४ लाख कोटींवर गेला आहे. ही प्रगती दूरदृष्टीच्या आर्थिक धोरणांमुळे शक्य झाली,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करत, “स्वच्छ भारत, एलपीजी योजना आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिका यामुळे केंद्र सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या,” असे सांगितले.



