
पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात रविवारी (दि. २४ मे) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘धगधगती मुंबई’च्या वतीने करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथील आठ युवक सहलीसाठी गेले होते. रविवारी रात्री त्यांची स्कॉर्पिओ गाडी (क्र. एमएच ११ डीएन २३४०) आंबेनळी घाटात दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि नितीन किसन नायकोंडे (वय ३५) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका तरुणाचा अपघाताच्या दिवशीच वाढदिवस असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रायगड व सातारा जिल्हा पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड-पोलादपूर येथील बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सोमवारी सकाळपासून बचाव मोहिमेला अधिक वेग देण्यात आला.
दरम्यान, ‘धगधगती मुंबई’चे संपादक तथा पत्रकार श्री. भीमराव हिंदुराव धुळप यांनी एप्रिल २०२६ मध्येच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीत रस्ते, पूल व नाल्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचे काँक्रीट वापरणे, योग्य प्रकारे क्युरिंग न करणे, नव्याने बांधलेल्या संरचनांमध्ये भेगा पडणे आदी गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या होत्या.
तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यकारी अभियंत्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे प्रथम लिपीक हेमंत गोसावी यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना शासन नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
तथापि, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. येत्या पावसाळ्यात या घाट मार्गावरील निकृष्ट बांधकामामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करत आहेत.
आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेनंतर संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



