मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प(डीआरपी) आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे (एसआरए) प्रमुख- मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी धारावी झोपडपट्टीवासियांची दिशाभूल करुन धारावीतील शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक दोन काॅग्रेस नगरसेवकांच्या नावे वेगळी भूमिका वृत्तपत्रातून मांडली.यावरुन शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले आहेत.यासंदर्भात या नगरसेवकांनी महेन्द्र कल्याणकर आणि अदानी कंपनीच्या मे.नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा.लि.विरुध्द धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.कल्याणकर यांना धारावीचा नव्हे तर अदानी कंपनीचा वेगाने विकास करायचा आहे असा आरोपही या नगरसेवकांनी केला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील लोकांना धारावीतच ५०० चौ.फू.ची घरे मिळाली पाहिजे तसे लेखी आश्वासन राज्य सरकार, एसआरए- डीआरपीने द्यावे यासाठी धारावी बचाव आंदोलन या संघटनेने मे महिन्याच्या सुरुवातीला भव्य मोर्चा धारीवीत काढला.या मोर्चानंतर धारावी बचाव आंदोलन ने धारावीकरांच्या मागण्यांबाबतचे एक निवेदन महेन्द्र कल्याणकर यांना सादर केले.यानंतर आपल्या मागण्या सरकारसमोर पोहोचवल्या जातील असे आश्वासन ही कल्याणकर यांनी दिले.असे असतानाच या मोर्चाच्या दुसर्याच दिवशी कल्याणकर यांनी धारावीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना बैठकीसाठी वांद्रे येथील एसआरए कार्यालयात बोलवले.तेथे या नगरसेवकांनी धारावी पुनर्विकास बाबत एसआरए-डीआरपी ला सहकार्य देण्याची भूमिका मांडली.मात्र सर्व पात्र-अपात्र धारावीकरांना धारावीतच ५०० चौ.फू.चे घर मिळालेच पाहिजे अशी भूमिकाही या नगरसेवकांनी कल्याणकर यांच्या समोर मांडली.असे असतानाही डीआरपी अपात्र लोकांना धारावीत घरे न देण्यावर ठाम आहे.यामुळेच डीपीआर एसआरए ने धारावीत सुरु केलेल्या कॅम्पना-शिबीरांना शिवसेनेचे नगरसेवक हजर राहणार नाहीत अशी भूमिका घेतलेली आहे.सरसकट सर्वच लोकांना पात्र करुन त्यांना धारावीत घरे देण्यात यावी अशी भूमिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे.असे असतानाही धारावीतील डीआरपीच्या शिबिरांना काँग्रेस व ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा पाठिंबा अशी दिशाभूल करणारी भूमिका वृत्तपत्रातून मांडून कल्याणकर व अदानी कंपनीने मांडून धारावी झोपडपट्टीवासियांची दिशाभूल केली आहे.म्हणून याबाबत आम्ही महेन्द्र कल्याणकर आणि अदानी कंपनी विरोधात धारावी पोलिसांकडे एक लेखी तक्रार अर्ज सादर केलेला आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक जोसेफ कोळी,अर्चना शिंदे, हर्षला मोरे आणि काँग्रेसच्या आशा काळे,बब्बू खान यांनी म्हटले आहे.
अदानी समूहाची नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास सुरु आहे.परंतु एसआरएचे प्रमुख महेन्द्र कल्याणकर यांना १२ लाख धारावीकरांचा तेथील झोपड्यांचा विकास करायचा नाही तर कल्याणकर यांना अदानी कंपनीचे कल्याण करायचे आहे.असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.म्हणूनच कल्याणकर हे धारावीतील जनतेची दिशाभूल करीत आहे असेही या नगरसेवकांनी म्हटलेले आहे.
सरसकट सर्वच धारावीकरांना पात्र करावे आणि कोणताही भेदभाव न करता सर्व धारावीकरांना धारावीतच ५०० चौ.फू.ची घरे द्यावीत ही लेखी हमी एसआरए डीआरपी आणि राज्य सरकारने द्यावी त्यानंतरच धारावीत झोपडपट्टीवासियांच्या पात्र-अपात्रेची पडताळणी करण्यासाठी शिबिरे कॅम्प धारावीत घ्यावेत अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे.
*आमदार सावंत , बाबुराव मानेंकडून अभिनंदन*
धारावीच्या मुद्द्यावर धारावी झोपडपट्टीवासियांच्या हिताची भूमिका धारावीतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली.यामुळे झोपडपट्टीवासियांमध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे.धारावीकर धारावी सोडणार नाही.राहणार धारावीत. तेही ५०० चौ.फू.च्या घरातच. या भूमिकेशी एसआरए प्रमुख महेन्द्र कल्याणकर यांच्यासमोर ते ठाम राहिले हे अत्यंत महत्वाचे आहे असे बाबुराव माने,महेश सावंत यांनी म्हटले आहे.अशी भूमिका घेतल्या बद्दल माने, सावंत यांनी शिवसेनेबरोबरच काॅग्रेसच्या दोन नगरसेवकांचेही या दोघांनी अभिनंदन केले आहे.




