ताज्या बातम्या

नवी मुंबईत २५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीसाठ्यात होत असलेली घट, वाढते तापमान आणि कमी पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही कपात मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होईपर्यंत कायम राहणार आहे.
महानगरपालिकेला मोरबे धरण तसेच म.औ.वि. महामंडळाच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असून सध्या केवळ ३६.४७० दशलक्ष घनमीटर म्हणजेच १९.११ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने “एल-निनो” आणि “आयओडी”मुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढत असल्याने पुढील वर्षाचा विचार करून आतापासूनच खबरदारीचे नियोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, सध्या शहरासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद
१० टक्के पाणी कपातीअंतर्गत विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
बेलापूर : सोमवार व गुरुवार
नेरुळ : मंगळवार व शनिवार
तुर्भे : बुधवार व रविवार
वाशी : गुरुवार व सोमवार
कोपरखैरणे : मंगळवार व शनिवार
घणसोली : बुधवार व रविवार
ऐरोली : शुक्रवार
दिघा : म.औ.वि. महामंडळाच्या संभाव्य शटडाऊननुसार
तसेच सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमध्ये दर शुक्रवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे तसेच जलपुरवठा व्यवस्थेची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top