ताज्या बातम्या

नवी मुंबईत भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक पर्व रंगणार

नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान आणि संवाद नात्यांचा, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य “शिवबा राजं ॥छत्रपती॥ झाल रं!” या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक साहेब उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी विशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी, लेखक, कवी आणि विचारवंत मा. श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये

संत साहित्य अभ्यासक व शिक्षणतज्ज्ञ मा. प्रा. श्री. इ. ए. पाटील (सीए), कवी व स्तंभलेखक मा. श्री. साहेबराव ठाणगे, लेखक व व्यसनमुक्ती अभ्यासक डॉ. श्री. अजित मगदुम तसेच महिला सक्षमीकरण अभ्यासक मा. सौ. शीतल निकम यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून “महाराष्ट्राचा शाहिरी बाणा” हा शाहिरी कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, राष्ट्रभूषण शाहीर रुपचंद चव्हाण आपल्या दमदार शैलीत शिवचरित्र आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा जागर सादर करणार आहेत.
नवी मुंबईत शिवराज्याभिषेक दिनाचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा निर्माण झाली असून, शिवतुतारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था, मंडळे आणि शिवप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होत आहेत. शिवचरित्र, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा नवी मुंबईकरांसाठी विशेष पर्व ठरणार आहे.
Scroll to Top