धारावी — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदिच्छा सामाजिक विकास संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार सोहळा शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल समोरील मैदान येथे उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या १३ व्या वर्षानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत समाजातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ॲड. नितीन सातपुते यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, समाजसेवक व समाजकार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे अत्यंत आवश्यक आहे. अशा सन्मानामुळे ते अधिक जोमाने समाजकार्यात पुढे येतात. तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी मराठी भाषा ही आपली संस्कृती असून तिचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी धारावीच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. १४ एप्रिलपासून सुरू झालेला बाबासाहेबांचा जयंती उत्सव अजूनही सुरू असल्याचे सांगत, गेली १३ वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवणाऱ्या संस्थेचे त्यांनी कौतुक केले. जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि संविधानाच्या माध्यमातून देशाला दिशा देणारे बाबासाहेब हे आपल्या देशाचे अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले.
यावेळी जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी, मुंबई आरपीआयचे सचिव अशोक बच्छाव, नगरसेविका हर्षदा आशिष मोरे तसेच ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांनीही आपले विचार मांडले. संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवारातर्फे संस्थेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार उत्तम बापू वाघमारे, समाजभूषण पुरस्कार आशिष वसंत मोरे व अनिल शिवराम कासारे, समाज गौरव पुरस्कार प्रकाश बाळकृष्ण सुर्वे (बौद्धाचार्य), कलाविष्कार गौरव पुरस्कार विजय विनायक दिवे, तर धम्म प्रेरणा पुरस्कार आयुष्यमती ज्योती दीपक सावंत व आयुष्यमती सुनिता ताई रवींद्र जाधव यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव भगवान कर्डक यांनी मानले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.




