ताज्या बातम्या

“पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला जनता धडा शिकवेल” — वसंत व्याख्यानमालेत अरविंद सावंत यांचे प्रतिपादन

मुंबई : बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये आयोजित ४४ व्या वसंत व्याख्यानमालेचा ‘आठवणीतले बाळासाहेब’ या विषयावरील व्याख्यानाने उत्साहात शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ठळक आठवण करून दिली.
“जो पक्ष तुम्हाला निवडून आणतो, त्याच्याशी गद्दारी करणे अयोग्य आहे. अशा गद्दारांना जनता रस्त्यावर उत्तर देते,” असे सांगत सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवणे आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना सावंत म्हणाले की, त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली आणि सामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. संघर्षमय काळातही त्यांनी शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत संघटना उभी केली. त्यांच्या नेतृत्वात कणखरपणा आणि ममत्व यांचा अनोखा संगम होता.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कुमार कदम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या अनेक घडामोडी सांगितल्या. डॉ. सुकृत खांडेकर यांनीही आपल्या भाषणात बाळासाहेबांचे पत्रकार आणि सामान्य नागरिकांप्रती असलेले प्रेम व पाठबळ अधोरेखित केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात साई स्पोर्ट्सच्या मुलींनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली. प्रा. नयना रेगे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Scroll to Top