ताज्या बातम्या
‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सदिच्छा सामाजिक विकास संस्थेचा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न“पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला जनता धडा शिकवेल” — वसंत व्याख्यानमालेत अरविंद सावंत यांचे प्रतिपादनजागतिक हिवताप दिनानिमित्त नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन     “१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान” छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

तळमावले/वार्ताहर : आजच्या व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या युगात पत्रांची जागा इमोजींनी घेतली आहे. मात्र, याच काळात आपल्या पाल्याकडून हातात पडलेले एक पत्र पालकांसाठी कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मोलाचे ठरले आहे. निमित्त होते विद्यानगर येथील सौ.स्वाती जोशी यांच्या जय भवानी क्लासने राबवलेल्या उपक्रमाचे. ज्यामध्ये इयत्ता ६ वीत शिकणाऱ्या चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे या विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे पत्र वाचताना त्याच्या पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.
स्पंदनने आपल्या पत्रात आई-वडिलांनी आजवर पुरवलेल्या सोयी-सुविधा, चांगल्या शाळेतील प्रवेश, सणासुदीला मिळणारे नवे कपडे आणि वेळोवेळी सहलीला नेऊन दिलेला आनंद याबद्दल मनापासून आभार मानले आहेत. “तुम्ही मला कधीही ‘नाही’ म्हणालात नाही, माझ्यासाठी नेहमी प्रार्थना केली, त्याबद्दल धन्यवाद,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना मांडल्या. एका लहान मुलाने पालकांच्या कष्टांची इतकी प्रगल्भतेने जाणीव ठेवणे, ही उपस्थित सर्वांसाठी कौतुकाची बाब ठरली आहे.
पत्राच्या शेवटी “तुमचा प्रेमळ मुलगा” अशी स्वाक्षरी वाचताना स्पंदनच्या पालकांना (डॉ. संदीप डाकवे व सौ. रेश्मा डाकवे) आपल्या मुलाने दिलेली ही सर्वात मोठी भेट वाटली. मुलांच्या मनात पालकांविषयी असलेला आदर आणि प्रेम जेव्हा अशा प्रकारे शब्दांतून व्यक्त होते, तेव्हा पालकांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सार्थक होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये कृतज्ञतेची भावना रुजावी आणि त्यांना पत्रांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने सौ.स्वाती जोशी यांच्या जय भवानी क्लासेस विद्यानगर यांच्यावतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पंदनचे हे पत्र सध्या समाजमाध्यमांवरही चर्चेचा विषय ठरत असून, संस्कारांच्या या ‘पोस्टा’ने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.

Scroll to Top