ताज्या बातम्या

पोलादपूर–महाबळेश्वर राज्य मार्गावरील निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह; पूल-नाल्यांमध्ये भेगा, प्रवाशांत संताप

पोलादपूर(अनिल मालुसरे) :पोलादपूर ते महाबळेश्वर या राज्य मार्गावरील सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केला जात आहे.
विशेषतः काँक्रीटीकरण केलेल्या पूल आणि नाल्यांमध्ये सुरुवातीपासूनच भेगा पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तज्ञांच्या मते, काँक्रीट कामानंतर आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा मारा (क्युरिंग) न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असण्याची शक्यता आहे. योग्य क्युरिंग न झाल्यास काँक्रीटची मजबुती कमी होते आणि त्याचा परिणाम दीर्घकालीन टिकाऊपणावर होतो.
यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नव्याने बांधलेले पूल आणि नाले वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“सार्वजनिक निधीतून होणाऱ्या या कामात दर्जाची तडजोड का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित ठेकेदाराने तातडीने योग्य पद्धतीने पाण्याचा मारा करून कामाची गुणवत्ता सुधारावी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जर वेळेत सुधारणा केली नाही, तर भविष्यात मोठे आर्थिक नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top