
बाळापूर (ता. सिल्लोड) : बाळापूर येथील जळगाव–छत्रपती संभाजी महाराज नगर रोडवरील यू पॉईंट परिसरात लावण्यात आलेले दिशादर्शक फलक आजही जुन्याच नावांनी झळकत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सरकारने नामांतराचा निर्णय घेतल्यानंतरही प्रत्यक्षात फलकांवर अद्ययावत नावे न लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
सदर ठिकाणी असलेल्या फलकांवर आजही औरंगाबाद असा उल्लेख दिसून येतो, तर प्रत्यक्षात शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर असे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर ऐवजी अहिल्याबाई होळकर नगर असा उल्लेख अपेक्षित असताना फलकांवर जुनेच नाव कायम आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना या विसंगतीमुळे नेमका बदल झाला आहे का, असा प्रश्न पडत आहे. परिणामी दिशाभूल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित रस्ते प्राधिकरणाने त्वरित दखल घेऊन सर्व दिशादर्शक फलक अद्ययावत करावेत, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर फलक बदलणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.




