मुंबई : ‘कोलोरेक्टल कॅन्सर जनजागृती महिना’ निमित्त देशभर करण्यात आलेल्या जीवनशैली आणि पचन आरोग्य सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईतील केवळ १८.९% नागरिकांना शौचात रक्त दिसणे हे कोलोरेक्टल कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, याची माहिती असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरात या आजाराबाबत जागरूकतेचा गंभीर अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेडने देशातील १४ प्रमुख शहरांमध्ये २५ ते ६५ वयोगटातील १०,१९८ लोकांवर हे सर्वेक्षण केले. यात पचनासंबंधी तक्रारी, त्यावरील लोकांची प्रतिक्रिया, डॉक्टरांकडे जाण्यास होणारा विलंब आणि जागरूकतेची पातळी यांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वेक्षणानुसार, ८०% पेक्षा जास्त लोक अॅसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधे घेतात. ६५% लोकांना अनियमित शौचाचा त्रास जाणवतो, तर ५०% पेक्षा जास्त लोक आठवड्यातून किमान तीन वेळा बाहेरचे किंवा पॅकेज्ड अन्न सेवन करतात. केवळ ४५.२% लोक नियमित व्यायाम करतात, तर जवळपास ४०% लोक तंबाखूचे सेवन करतात.
मुंबईतील ७८६ नागरिकांच्या विशेष विश्लेषणात परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे दिसून आले. ८५% पेक्षा जास्त लोक शौचाच्या सवयींमध्ये बदल होऊनही डॉक्टरांकडे जाणे टाळतात. ५८% लोकांना अनियमित शौचाचा त्रास आहे, तर ८६% लोक वारंवार बाहेरचे अन्न खातात. ८७.५% लोक अॅसिडिटी किंवा गॅससारख्या समस्यांवर स्वतःच उपचार करतात.
विशेष म्हणजे, २७.८% लोकांनी शौचात रक्त दिसूनही डॉक्टरांकडे न जाता स्वतःच औषधे घेतल्याचे सांगितले. डॉक्टरांकडे न जाण्यामागे वेळेअभावी (२९.६%), भीती, लाज किंवा समस्या गंभीर नसल्याचा गैरसमज ही कारणे समोर आली.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना पचनासंबंधी लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या आतड्यात किंवा मलाशयात होणारा कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीला ‘पॉलिप्स’पासून सुरू होतो आणि वेळेत निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. शौचाच्या सवयींमध्ये बदल, शौचात रक्त, पोटदुखी, थकवा किंवा अचानक वजन घटणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, फायबरयुक्त आहार, नियमित व्यायाम, तंबाखूपासून दूर राहणे आणि वेळोवेळी तपासणी (कोलोनोस्कोपी) केल्यास या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.




