ताज्या बातम्या

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विठोबाचीवाडी शाळेतील 10 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

कराड(प्रताप भणगे) : “सामाजिक कार्य हे केवळ एक व्यवसायिक शिस्त नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे,” या उक्तीप्रमाणे कराड तालुक्यातील विठोबाचीवाडी येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठोबाचीवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘धगधगती मुंबई’चे पत्रकार प्रताप आबासो भणगे यांच्या पुढाकारातून शाळेतील 10 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय फीमध्ये जात प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले.
या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी भणगे यांनी स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. जात प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे कठीण असते. कोणताही विद्यार्थी शासकीय सुविधांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि पालक यांच्याशी समन्वय साधत प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले.
या निमित्ताने शाळेत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रताप भणगे, मुख्याध्यापक पवार सर, सहाय्यक शिक्षक पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अश्विनी चव्हाण, प्रशांत चव्हाण, आरती चव्हाण, प्रवीण मलगौंडे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ‘बाल आनंद मेळावा’ अंतर्गत आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेत सई गणेश चव्हाण व श्रेयस शंकर चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल ग्रामस्थांच्या हस्ते त्यांना लेखन साहित्य देऊन गौरविण्यात आले.

Scroll to Top