ताज्या बातम्या

म्हसवड नगरीमध्ये विनापरवाना बंधारा पडल्या बाबतची तक्रार, अद्याप चौकशी नाही….

म्हसवड(अजित जगताप) : लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धनाथ च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी विनापरवाना म्हसवड हद्दीत माण गंगा नदीत यात्रा पटांगण शेजारी असलेला माणदेशी फाऊंडेशन बंधारा पाडण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केलेली आहे. अद्यापही याप्रकरणी कुणालाही दोषी न धरता पोलीस यंत्रणा कर्तव्यदक्षतेने काम करत असल्याचे माहिती मिळाली आहे.
म्हसवड नगरीमध्ये मानगंगा नदीच्या किनारी वार्षिक यात्रा भरते. तसेच या ठिकाणी बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यासाठी पाटबंधारे विभाग व शासनाने निधी उपलब्ध केला. परंतु आता ब्रेकरच्या साहयाने शासनाच्या जागेतील बंधारा पाडत असतानाही पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा हात बांधून बसलेले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी. तक्रार मागे घेण्याची वाट पाहू नका. असा गर्भित इशारा सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी संबंधितांना दिलेला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, म्हसवड मधील माणगंगा नदी पात्रात
माणदेशी फाऊंडेशन बंधारा शासनाच्या जागेत बांधण्यात आलेला आहे. दिनांक २१ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सदरचा बंधारा ब्रेकरच्या साह्याने उध्वस्त करण्यासाठी सहा कामगार झटत असल्याची माहिती श्री केवटे यांना मिळाली. त्यांनी याबाबत लोकशाही मार्गाने सदरच्या कामगारांना कोणाच्या आदेशावरून आणि हा बंधारा का पाडण्यात येत आहे? अशी शांतपणाने विचारणा केली असता त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सहा कामगारांपैकी एका कामगाराने सांगितले की, म्हसवड येथील पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते विजय दत्तात्रय गुरव (विजय सिन्हा) यांनी ब्रेकरच्या साह्याने हा बंधारा पाडण्यास लावले आहे. सदर घटनास्थळी मीनी टॅक्टर व बांधकाम पाडण्याची आधुनिक यंत्रणा त्यावर ब्रेकरची मशिन बसवून व त्याला जोडलेले २ ब्रेकर होते.
महाराष्ट्र शासनाची शासनाची परवानगी नसताना हे काम बेकायदेशीर रित्याच
चालू होते. त्याच वेळेस विजय सिन्हा बंधारा नजीक आले आणि त्यांनी श्री केवटे यांना तुला काय कारायचे आहे ते कर, मला
माणच्या मंत्र्यांचा सपोट आहे. कोणी माझे काही करू शकत नाही. त्यामुळे मी तेथून शाब्दिक वाद न घालता निघून आलो. तरी शासनाच्या जागेतील बांधलेला बंधारा तोडत असलेले बेकायदेशीर काम बंद करून ब्रेकर मिशन ट्रक्टर तसेच ज्याने हे काम करायला लावले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असे निवेदनात श्री अजिनाथ केवटे यांनी नमूद केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नाट्य मध्ये पोलिसांनी तत्परतेने अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले होते. हा सर्व प्रकार भाजपच्या सांगण्यावरून झाल्याची जाहीर चर्चा होत आहे. ही चर्चा ताजे असतानाच म्हसवड नगरीमध्ये भाजपच्या मंत्र्यांचे नाव सांगून बंधारा पाडून लाखो रुपयांचे नुकसान केले जात आहे. एवढेच नव्हे तर तक्रारदाराला दमदाटी केली जात आहे. तसेच त्याने तक्रार मागे घ्यावी यासाठी त्याच्यामागे तगादा लावला जात आहे. तक्रारदार जर ऐकला नाही तर त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून त्याला अटक होण्याची भीती त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. विकास कामे करण्यापेक्षा राजकारणासारखी तोडफोड व तोडातोडी मान तालुक्यात होत आहे. असे अजिनाथ केवटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यामध्ये दुष्काळ हटवण्यासाठी अनेक बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे ठेकेदारांचे उकळ पांढरे झाले असले तरी आजही मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये टँकर पुरवठा करण्याची मागणी होत आहे. स्वतःला जलनायक समजणाऱ्यांनी कधीतरी सत्य समजून घ्यावे व जनतेची तहान भागवावी. अशी सामाजिक कार्यकर्ते श्री केवटे यांनी विनंती केली आहे. एकतर शासनाचा निधी विकास कामासाठी लवकर मिळत नाही. विकास कामे करताना टक्केवारी द्यावी लागते. आणि त्यानंतर निधी मंजूर होतो आणि मंजूर झालेला विकास कामे विनापरवाना तोडणे हा राष्ट्रद्रोह आहे. शासनाची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी बंधारास नव्हे तर संपूर्ण माण तालुक्यात निकृष्ट दर्जाची झालेली विकास कामे पाडावीत. नव्याने निधी आणून ठेकेदारांचे कल्याण करावे. असाही उपरोधात्मक सल्ला दिला आहे. दरम्यान, याबाबत सार्वत्रिक सुट्टी असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही._______________________

फोटो– म्हसवड येथील मानगंगा नदीतील बंधारा ब्रेकरच्या साह्याने पाडताना कामगार

Scroll to Top