ताज्या बातम्या

धारावीतील स्पार्कल स्पोर्ट्स अकॅडमीचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुंबई(विनोद बामणे) : धारावीतील स्पार्कल स्पोर्ट्स अकॅडमीने यशस्वी वाटचालीची सहा वर्षे पूर्ण केली असून, हा आनंदाचा क्षण अकॅडमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या सहा वर्षांपासून अकॅडमीमध्ये मुला-मुलींना फुटबॉलसह विविध क्रीडा प्रकारांचे शिस्तबद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षकांकडून खेळासोबतच शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास यांचेही उत्तम संस्कार केले जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून अकॅडमीचे विशेष कौतुक होत आहे.

अकॅडमीतील वातावरण आनंददायी असल्यामुळे अनेक मुले आवर्जून येथे खेळ शिकण्यासाठी येतात. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दलची आवड दिवसेंदिवस वाढत आहे.

६ व्या वर्धापन दिनानिमित्त अकॅडमीत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांच्यासोबत हा आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.

स्पार्कल स्पोर्ट्स अकॅडमीने क्रीडा क्षेत्रात अशीच यशस्वी वाटचाल करत भविष्यातही अनेक उत्कृष्ट खेळाडू घडवावेत, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Scroll to Top