ताज्या बातम्या

धगधगती मुंबई परिवारातर्फे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना राजगिरा लाडू, केळी व तुळशी रोपांचे वाटप

प्रतिनिधी

: आषाढी एकादशीचे औचित्य साधून धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी परिवारातर्फे सालाबादप्रमाणे विविध ठिकाणी भक्तीमय वातावरणात प्रसाद व तुळशी रोप वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे शेकडो भाविकांना राजगिरा लाडू, केळी आणि तुळशीची रोपे वाटप करण्यात आली.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सुयश सामाजिक शिक्षण संस्था संचलित शारदा विद्या मंदिर येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी धारावी (खांबदेव नगर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच वाशी, नवी मुंबई येथील प्रसिद्ध जागृतेश्वर मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून राजगिरा लाडू, केळी आणि तुळशीची रोपे वाटण्यात आली.
या प्रसंगी ट्रस्टचे प्रमुख कार्यवाहक रामभाऊ शामराव पाटील, ह.भ.प. भास्कर महाराज म्हात्रे (प्रवचनकार व कीर्तनकार), कार्यकारी मंडळाचे सदस्य, रमेश संकपाळ, सौ. दिपाली संकपाळ, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप, संतोष कदम, सागर बोबडे, विनोद बामणे, अर्जुन भेदाटे, संतोष काळे, पृथ्वीराज बोबडे, ओमकार धुळप आणि संतोष लिंबोरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जागृतेश्वर मंदिर परिसरात हरिपाठ, विठ्ठलनामाचा अखंड गजर, प्रवचन आणि भक्तिमय वातावरणाचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे प्रसाद व तुळशी रोप देऊन स्वागत करण्यात आले. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी परिवाराने राबविलेला हा उपक्रम भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला. प्रसाद वाटपातून समाजसेवा, भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

Scroll to Top