कराड : मौजे घोगाव, ता. कराड, जि. सातारा येथील श्री बाळसिद्ध मंदिरात यंदा श्री बाळसिद्ध श्रावणी यात्रेचे १९ वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. सन २००८ पासून सुरू असलेल्या या श्रावणी यात्रेनिमित्त श्रावण महिन्यात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, आरती व तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या निमित्ताने रविवार १६ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावणी पहिला रविवार, रविवार २३ ऑगस्ट रोजी दुसरा रविवार, शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद, रविवार ३० ऑगस्ट रोजी तिसरा रविवार आणि रविवार ६ सप्टेंबर २०२६ रोजी चौथा रविवार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावणी यात्रेतील चारही रविवार तसेच पौर्णिमेच्या दिवशी पहाटे ५ वाजता श्री बाळसिद्ध माऊलींचा अभिषेक, सकाळी ६ वाजता पहिली आरती, सकाळी १० वाजता दुसरी आरती व त्यानंतर तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ वाजता आरती होणार आहे. अशा प्रकारे भाविकांना दिवसभर तीन वेळा आरतीचा लाभ घेता येणार आहे.
रक्षाबंधन पौर्णिमा, शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी देणगी अथवा धान्य देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी दि. २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री बाळसिद्ध माऊलींच्या दर्शनासाठी, आरतीसाठी व तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ, घोगाव, आटके, दुशेरे तसेच परगावचे पाहुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे




