ताज्या बातम्या

विरारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा प्रवास : महापौर अजीव पाटील

विशेष lekh : विरार हा अजीव पाटील यांच्यासाठी केवळ एक प्रभाग नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या जडणघडणीत लक्ष घालणारा कार्यक्षेत्र आहे. वेळप्रसंगी स्वतःच्या पक्षाच्या किंवा नेत्यांच्या भूमिकांशी असहमती दर्शवूनही निर्भीडपणे भूमिका मांडण्याची आणि कठीण विभागात उतरून विरोधकांशी थेट सामना करत विजय मिळवण्याची परंपरा त्यांनी यावेळीही कायम ठेवली आहे.
१९८५–८६ पासून पत्रकारितेची आवड जोपासत पुढे पत्रकारांचे मित्र म्हणून ओळख निर्माण करणारे, साहित्य व कलेत मनापासून रमणारे अजीव पाटील हे व्यक्तिमत्त्व १९६४ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या त्यांचे मामा भास्करराव ठाकूर यांच्या संस्कारातून घडले. समाजकारणाचे बाळकडू घेतलेले आणि व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेले अजीव पाटील यांची वाटचाल ही सातत्य, संयम आणि टीमवर्कची कहाणी आहे.
१९८५–८६ मध्ये भावाच्या व्यवसायात हातभार लावत असतानाच, १९८७ साली मित्रांसोबत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अनेक शालेय मित्रांना सोबत घेत व्यवसायात सातत्याने प्रगती साधली. याच काळात तत्कालीन आमदार कै. पंढरीनाथ चौधरी यांनी काही झोपडपट्टी भागांतील समस्यांबाबत भाई ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी उपस्थित असलेल्या प्रदीप तेंडोलकर, जीतूभाई शहा, हेमंत म्हात्रे, पंकज ठाकूर आणि अजीव पाटील यांना या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे निर्देश भाई ठाकूर यांनी दिले. येथूनच बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या या टीमने विविध विभागांतील समस्या सोडवण्याचा जो प्रवास सुरू केला, तो आजतागायत अखंड सुरू आहे.
भास्करराव ठाकूर, भाई ठाकूर, दीपक ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजीव पाटील यांची सामाजिक व राजकीय वाटचाल हितेंद्र ठाकूर आमदार होण्यापूर्वीपासूनच सुरू झाली होती. पुढे हितेंद्र ठाकूर यांच्या मित्रपरिवाराचे सहकार्य पालघर जिल्ह्याभर विस्तारले. काँग्रेस, वसई विकास मंडळ आणि पुढे बहुजन विकास आघाडी अशी राजकीय नावे बदलली; मात्र समाजाशी असलेली नाळ आणि राजकीय प्रवास अखंड राहिला.
१९८५–८६ साली स्थापन झालेल्या यंग स्टार्स ट्रस्टमधून कला, क्रीडा व साहित्याचा जो अंकुर फुलला, तो आज वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव या वटवृक्षाच्या रूपात उभा आहे. अनेक सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे आली; परंतु टीमवर्कच्या जोरावर प्रत्येक वादळ समर्थपणे परतवले गेले. या प्रत्येक टप्प्यावर अजीव पाटील यांचा खारीचा वाटा मोलाचा ठरला.
१९९० साली झालेल्या पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत दोन प्रभागांतील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला; मात्र इतरांना संधी देत त्यांनी नम्रपणे बाजूला राहणे पसंत केले. मात्र १९९६ साली अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नगरपालिका ते महानगरपालिका स्तरावर बांधकाम सभापती, विविध समित्यांचे सदस्य तसेच दोन वेळा स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी प्रत्येक पदावर ठसठशीत कामगिरी केली.
युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विशेष योजनांना आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महिला व बालकल्याण समितीवर कार्यरत असताना प्रथम महिला महापौर प्रवीणाताई यांच्या सोबत महिला व बालकल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. स्थायी समितीवर असताना मंजूर केलेल्या विक्रमी विकासकामांचा ठसा आजही जनतेच्या स्मरणात आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर न्यायालयीन लढा असो वा वृत्तपत्रीय संघर्ष—स्वर्गीय मुकेश सावे, मा. उमेश नाईक आणि मा. इक्बाल हुद्दा यांच्यासोबत ते नेहमी आघाडीवर राहिले. पहिल्या महापालिका निवडणुकीत विरोधकांचा विरोध मवाळ करत, त्यांच्या विभागांतही विकासकामे घडवून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा “सर्वसमावेशक विकास” हा विचार त्यांनी प्रत्यक्षात उतरवला.
शेवटच्या क्षणापर्यंत इतरांना संधी देणारे अजीव पाटील यावेळीही तसेच करतील, अशी अपेक्षा होती; मात्र समर्थकांच्या आग्रहामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली. पडद्यामागे राहून संकल्पना मांडणे व त्या प्रत्यक्षात उतरवणे हा त्यांचा स्वभाव आहे. सध्या ते यंग स्टार्स ट्रस्ट, कोकण मराठी साहित्य परिषद, साहित्य जल्लोष, कला-क्रीडा महोत्सव, जिल्हा नियोजन समिती, वसई विकासिनी संस्था तसेच अनेक सामाजिक संस्थांवर सक्रिय आहेत.
यंग स्टार्स ट्रस्टच्या माध्यमातून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत रेकॉर्डब्रेक उपक्रम राबवून त्यांनी वसईला सकारात्मक व वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आता वसई-विरार शहराचे महापौर म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा….

— विवेक पाटकर (पत्रकार)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top