ताज्या बातम्या

पंचायत समिती निवडणूक प्रचारात तळदेव गणातील उमेदवार थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात

तापोळा(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुका म्हटला की स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी ओळखला जातो. अशाच या तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत, मतदार राजा आपल्या उपजीविकेसाठी शेतात राबत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तळदेव गणातून निवडणूक लढवत असलेले उमेदवार अभिषेक शिंदे यांनी थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या या साध्या व थेट प्रचारपद्धतीमुळे शेतकरी व कष्टकरी वर्गामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजपर्यंत निवडणूक प्रचार म्हटला की महागड्या गाड्या, मोठ्या मिरवणुका आणि पुढे-पुढे करणारे स्वयंघोषित नेते अशीच चित्रे पाहायला मिळतात. मात्र, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणारा उमेदवार दिसल्यास खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत असल्याचे चित्र समोर येते, असे मत या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी उमेदवार अभिषेक शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “माझी ही लढाई दंडेलशाही आणि मोजक्या सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाविरुद्ध आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असून विकासाच्या नावाखाली तेच उमेदवार, तेच ठेकेदार आणि तेच सत्ताधारी अशीच परिस्थिती कायम आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “मी ज्या भागातून निवडणूक लढवत आहे तो सोळशी विभाग असून तो तळदेव गणाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील उमेदवारीमुळे निर्माण झालेल्या गटबाजीमुळे आज या विभागाला ठोस राजकीय नेतृत्व मिळालेले नाही.”
या पार्श्वभूमीवर अभिषेक शिंदे यांनी विभागातील जनतेला आवाहन करत सांगितले की, “पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या विभागाचा नेतृत्वाचा इतिहास जपण्यासाठी आणि बालेकिल्ला सक्रिय ठेवण्यासाठी सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहून मला आशीर्वाद द्यावेत.”
शेतकरी बांधावरून सुरू झालेल्या या थेट संवादात्मक प्रचारामुळे तळदेव गणात राजकीय चर्चांना वेग आला असून, युवक नेतृत्वाला मिळणाऱ्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top