महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असले, तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कोणत्याही पक्षाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची जोरदार धडपड सुरू आहे. उमेदवारीसाठी अंतर्गत चाचपणी, गटनेते आणि वरिष्ठ पातळीवरील चर्चांमुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे चित्र आहे.
या दरम्यान, दोन्ही पक्षांतील काही नाराज इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर होणार की पक्षांतर्गत व पक्षांमधील जिरवा-जिरवीच्या राजकारणावर केंद्रित होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या राजकीय घडामोडींमध्ये सर्वसामान्य जनता भरकटण्याची शक्यता असून, विकासाच्या दृष्टीने सक्षम आणि काम करणारा उमेदवार निवडावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसांत उमेदवारी जाहीर होताच महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.




