प्रतिनिधी : मुंबई महापालिकेचा गड खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
या पार्श्वभूमीवर मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा हे मुद्दे पुन्हा एकदा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. भाजपने या मुद्द्यांसोबतच विकासाचा रोडमॅपही मतदारांसमोर मांडला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनीही आपले विकासाचे व्हिजन सादर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांपैकी कोण उजवं ठरणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील जागावाटपावर थेट भाकीत केले आहे. “मुंबईत उद्धव ठाकरेंच्या सेनेला 45 जागा, तर मनसेला 20 जागा मिळतील,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “मी आकडेमोड सांगण्यात माहिर आहे. भाजप आणि शिवसेनेच्या किती जागा निवडून येणार आहेत, हे मी कानात सांगू शकतो,” असे मिश्किल वक्तव्यही त्यांनी केले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, उद्धव सेनेला 45 आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला 20 जागांनंतर पुढे गाडी थांबेल. महापौर पदासाठी आवश्यक असलेल्या 11 नगरसेवकांपैकी एक-दोन नगरसेवकच त्यांच्या बाजूचे असतील, असा दावाही त्यांनी केला आहे. आता या आकडेमोडीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




