प्रतिनिधी : मुबईतील निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदानासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ सुरू आहे. ठाणे परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या उमेदवारांना निवडणूक न लढण्यासाठी एक ते पाच कोटी रुपयांच्या ऑफर्स दिल्याचा आरोपही त्यांनी केला. “जे लोक प्रत्यक्ष काम करतात, ते काम घेऊन जनतेसमोर येतात. पण ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, ते पैसे वाटतात,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आपल्या भाषणात त्यांनी सरिताताई नामक उमेदवाराचा उल्लेख करत त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. तसेच, कुणी पैसे वाटताना आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
“मुंबईची अस्मिता टिकवण्यासाठी आपल्या कर्तव्याला चुकू नका. मुंबई आपलीच आहे आणि ती आपल्या ताब्यात ठेवा,” असे आवाहन करत त्यांनी मतदारांना सजग राहण्याचा संदेश दिला.




