महाराष्ट्रातील

२९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता झाली. तत्पूर्वी रविवारी व सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप महायुती तसेच ठाकरे बंधूंच्या मुंबई ठाण्यात झालेल्या दोन संयुक्त प्रचार सभा यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. सुरुवातीला भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याची चिन्हे होती, परंतु मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे बंधूंच्या विराट प्रचार सभेने चित्र पालटल्याचे दिसले. दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच शिवाजी पार्कवर महायुतीची सभा झाली. त्यामुळे या दोन्ही सभांची तुलना होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभेला फारशी गर्दी दिसत नव्हती. त्यामुळे गर्दीचे फोटो दाखवण्यापेक्षा कॅमेरे व्यासपीठाभोवती फिरताना दिसत होते. व्यासपीठाजवळचा भाग कॅमेरांनी टिपला. त्याउलट ठाकरे बंधूंची मुंबईतील सभा असो की ठाण्यातील सभा असो दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या कोनातून दूरवरपर्यंत किती गर्दी झाली आहे ते कॅमेऱ्यांनी दाखविले. त्यावरून दोन्ही ठिकाणी ठाकरे बंधूंच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पण महायुतीच्या मुंबईच्या सभेला तेवढा प्रतिसाद लाभला नाही, अशी दृश्य होती. महायुतीच्या प्रचार सभेत प्रामुख्याने भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम, माजी मंत्री रामदास कदम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषण झाली. तथापि, रविवारच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योगपती आदानी यांच्या साम्राज्य विस्ताराचे जे प्रेझेंटेशन केले त्यावर मुख्यमंत्री फडणवीस ठोस आणि पटेल असे उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी गुळमळीत उत्तर दिले. म्हणजे त्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांची ज्या राज्यांमध्ये सत्ता आहे तेथेही आदानी यांचे विविध उद्योग-प्रकल्प सुरू असून त्या त्या राज्यांमधील प्रमुख नेत्यांबरोबर आदानींचे फोटो असल्याचे दाखविले. तथापि, सध्या देशातील २० राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या युतीची सरकारे आहेत. राज ठाकरेंनी उद्योगांच्या विरोधात आपण नसल्याचे स्पष्ट केले होते. पण एकाच उद्योगपतीवर एवढी मेहरबानी का ? हा त्यांचा सवाल होता. एकाधिकारशाही आणि मोनालीला मोनोपॉलीला त्यांचा विरोध आहे. त्याचे स्पष्टीकरण फडणवीस देऊ शकले नाहीत. वीज, विमानतळ, पोर्ट, पोलाद आदी सर्वच उद्योग आदानींनी कसे मिळवले ? त्यामुळे देशाचे भवितव्य एकाच उद्योगपतीवर अवलंबून असणार, हा खरा मुद्दा आहे. सिमेंट उद्योगात आदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. उद्या वीज बंद पडली, सिमेंटचे, लोखंडाचे भाव वाढवले गेले तर जनतेला ते सहन करावे लागणार. सरकारही काही करू शकणार नाही. म्हणजे उद्या देश आदानींवर अवलंबून असणार, या मुद्द्याला समर्पक उत्तर महायुतीच्या सभेतून मिळाले नाही. बाकी आरोप-प्रत्यारोप नित्याचेच होते. सोमवारी ठाणे येथील संयुक्त प्रचार सभेत राज ठाकरे यांनी गंभीर तितकेच लक्षवेधी आरोप केले. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना पाच पाच हजार रुपये वाटले जात आहेत. तेथील एका प्रभागातील एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ कोटींची ऑफर दिली गेली. ती त्यांनी नाकारली. उमेदवारी मागे घेण्यासाठी कोणाला एक कोटी तर कोणाला पाच कोटी रुपयांची ऑफर दिली गेली. ही ऑफर नाकारणाऱ्या दोन उमेदवारांना राज ठाकरे यांनी व्यासपीठाजवळ बोलावले. अशाप्रकारे ऑफर नाकारणाऱ्यांना समोर आणायचे होते पण प्रचार करायला अवघे दोन दिवस उरल्याने त्यांना बोलावले नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अशा प्रकारे एक कोटी रुपयांची ऑफर नाकारणाऱ्या महिला उमेदवाराला व्यासपीठाजवळ बोलावले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदे यांच्या सेनेचे लोक ते पकडत आहेत, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. मंगळवारी आणि बुधवारीही सरकारकडून पैसे वाटायला सुरुवात होईल, असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून आठ कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय दारू आणि अन्य साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. उद्या बुधवारची रात्र त्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या रात्रीत निवडणुकीचे निकाल फिरवण्याचे सर्व ते प्रयत्न केले जातील. केवळ पैसे वाटपच नव्हे तर विविध प्रलोभानेही जाहीरनाम्यातून सर्व प्रमुख पक्षाने दिली आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये निवडणुकीच्या ४८ तास आधी देण्याचे सरकारने ठरवलं होते. परंतु विरोधकांनी त्याला आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाने हे पैसे देण्यास मज्जाव केला आहे. सत्ता पैसा आणि यंत्रणांचा वापर करून सत्ता कशी मिळवता येते हे सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. या निवडणुकीत उमेदवारी, देताना सर्वच राजकीय पक्षांनी ‘निवडून येण्याची क्षमता’ याच निकषाला प्राधान्य दिलेले दिसते. परिणामी महापालिका निवडणुका लढवीत असलेल्या एकूण १५ हजार ७५० उमेदवारांपैकी ३ हजार १५० उमेदवार हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारामारी, खंडणी, विनयभंग आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय घराणेशाही सर्वच पक्षात दिसून आली आहे. बदलापूरमध्ये एका शाळेतील चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद बहाल केले. त्यावरून चौफेर सडकून टीका होताच त्या आपटेला नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडून ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आणले गेले. त्यात भाजपच्या ४४ नगरसेवकांचा समावेश आहे. आता या निवडीचा सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. तोवर हे निकाल स्थगित ठेवण्यात आले आहेत. असे जर होत असेल तर निवडणुका घेण्यात अर्थ काय ? कशासाठी निवडणुका घ्यायच्या आणि लढवायच्या ? उमेदवार बिनविरोध निवडून येणे हा मतदारांवर अन्याय नाही का ? याचा विचार कोण करणार ? निवडणूक निवडून येण्याची क्षमता आहे म्हणून गुंडांना उमेदवारी दिली जात असेल तर निष्ठावंतांचे काय ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत. या निवडणुकीत शहकाटशहाचे राजकारणही दिसून येत आहे. सत्तेत आणि महायुतीत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून वगळण्यात आले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी युती केली आहे. अन्यत्र अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेत सहभागी असूनही अजित पवार भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. दुसरीकडे मुंबईत महायुतीच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येथील, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा होती. परंतु अमित शहा आले नाहीत. त्यामुळे फडणवीस यांना एकट्यानेच प्रचाराची धुरा सांभाळावी लागली. त्यातही देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात विकास पुरुष म्हणून देवाभाऊंचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. तो कदाचित भाजप श्रेष्ठींना रुचत नसावा. त्यामुळे देवाभाऊंच्या नेतृत्वाची कसोटीच या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. यात ते कितपत यशस्वी होतात, यावर पक्षश्रेष्ठींची पुढची रणनीती अवलंबून असेल. मुंबईत सुरुवातीला शिंदेंना ५०-६० जागा देण्यात भाजप तयार होता, परंतु शिंदेंच्या सहभागाशिवाय मुंबई महापालिका निवडणूक जिंकता येणार नाही. म्हणून काहीही करून त्यांना सहभागी करून घ्या, अशी सूचना अमित शहांनी केल्यामुळे शिंदे सेनेला भाजपने ९० जागा दिल्या. मात्र एवढे करूनही महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेत आली नाही तर शिंदेंनाही दूर करण्यास भाजप मागे पुढे पाहणार नाही. एकूण काय तर या निवडणुकीत पैसे देऊन मते घेतली जातील, अशी चिन्हे आहेत. बाजारात आपण पैसे देऊन वस्तू विकत घेतो. तसाच प्रकार या निवडणुकीत होताना दिसत आहे. या निवडणूक बाजाराचा निकाल काय लागेल, हे पाहण्यासाठी दिनांक १६ पर्यंत थांबायला हवे.




