मुंबई — बेस्टमध्ये सुरु असलेले खासगीकरण हे बेस्टमधील कामगारांच्या मुळावर आलेले आहे.म्हणून बेस्टमधील खासगीकरण ताबडतोब बंद करा,अदानी कंपनीस धारावी व त्यालगतच्या भागाचा वीज पुरवठा विभाग देण्यात येऊ नये यासह बेस्ट कामगार- कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी
बेस्ट मधील १२ कामगार संघटना एकवटल्या आहेत.या कामगार संघटनांनी बेस्ट कामगार समन्वय समिती स्थापन केलेली आहे.या समितीच्या झेंड्याखाली शनिवारी दिनांक १० जानेवारी रोजी परळ शिरोडकर हाॅल येथे सायंकाळी ५.३० वा. एक सभा आयोजित केली आहे असे बेस्ट कामगार समन्वय समितीचे नेते आणि मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमामध्ये होत असलेले खासगीकरण थांबवण्यात यावे व अदानी कंपनीमध्ये कंत्राटी पद्धत थांबवण्यात यावी बेस्टमधील व अदानी मधील कामगार कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत व रिक्त पदावर कामगारांना पदोन्नती देण्यात यावी,बेस्ट मधील कंत्राटी ड्रायव्हर कामगारांना कायम करण्यात यावे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१६ पासून नवघणी पदावर कायम करून वेतनाची थकबाकी रक्कम देण्यात यावी,१ एप्रिल २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने बेस्ट कामगारांच्या वेतनवाढीचा करार करण्यात यावा,अदानी कंपनीतील करारा प्रमाणे कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम पदावर सामावून घेण्यात यावे,बेस्ट उपक्रमातील कामगार वसाहती व आगारांच्या जागा या खासगी बिल्डरला देण्याची पध्दत बंद करा, विज ग्राहकांच्या हितासाठी व बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या धारावी व त्या लगतचा वीज पुरवठा विभाग अदानी कंपनीला देण्याची पद्धत हाणून पाडण्यासाठी या व इतर मागण्यांवर लवकरच या १२ कामगार संघटनां तर्फे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी शिरोडकर हाॅलला ही सभा होणार असल्याचे विठ्ठलराव गायकवाड साहेब यांनी स्पष्ट केले आहे.



