ताज्या बातम्या

तमाशा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना हास्यविनोदवीरांनी दिला, हास्यकलेचा कानमंत्र…!

मुंबई (खंडुराज गायकवाड) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लोककला अकादमीत सुरू असलेल्या तमाशा प्रशिक्षण शिबिरात हास्याची फुलं उमलली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या ओठांवर हसू फुलवणारे सुप्रसिद्ध हास्यविनोदीवीर अरुण कदम आणि ओमकार भोजने यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विनोदनिर्मितीचे सूक्ष्म धडे देत, हास्यकलेचा कानमंत्र दिला.
विनोद म्हणजे केवळ शब्दांची कसरत नव्हे, तर जीवनानुभव, निरीक्षणशक्ती आणि सादरीकरणातील सहजतेचा सुंदर मिलाफ आहे, हे त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून उलगडून सांगितले. दैनंदिन जीवनातील साध्या घटनांमधून प्रभावी विनोद कसा जन्माला येतो, प्रेक्षकांची नाडी ओळखून संवाद कसा साधायचा आणि रंगमंचावर सहजता कशी राखायची, याचे जिवंत प्रात्यक्षिकही त्यांनी सादर केले.
या सत्रामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य तर उमललेच, शिवाय तमाशातील हास्यविनोदाच्या परंपरेची नव्या पिढीला सखोल ओळख मिळाली. लोककलेच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिरात हास्याच्या माध्यमातून कला अधिक समृद्ध करण्याचा प्रेरणादायी संदेश यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.कलाक्षेत्रात नेमके काय साध्य करायचे आहे, याची स्पष्ट सीमारेषा स्वतःसाठी ठरवली की स्वप्नांना दिशा मिळते आणि अपेक्षांचा भंग होत नाही, असे मोलाचे विचार यावेळी अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या ओघवत्या, अनुभवसंपन्न शब्दांतून ठामपणे मांडले.
यावेळी या शिबिराला मुंबई विदयापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.मंगेश बनसोड, खंडूराज गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लोककला अकादमीचे विभाग प्रमुख तथा शिबीर प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे आणि सह प्रा.डॉ.शिवाजी वाघमारे यांनी यावेळी पाहुण्यांचे स्वागत केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top