मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीस अवघे आठ दिवस शिल्लक असताना अद्याप २२७ प्रभागांची अंतिम मतदार यादी जाहीर न झाल्याने लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरटीआय अॅक्टिव्हिस्ट व सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे तातडीची व ठोस मागणी केली आहे.
निवडणुकीच्या इतक्या जवळच्या टप्प्यावर अंतिम मतदार यादी उपलब्ध नसणे हा अत्यंत गंभीर व चिंताजनक प्रकार असल्याचे गलगली यांनी स्पष्ट केले. यामुळे मतदारांना आपली नावे तपासण्याची व चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याची संधी मिळत नाही. परिणामी बनावट, दुहेरी अथवा अपात्र मतदार नोंदी राहण्याची शक्यता वाढते आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होतो, असा आरोप त्यांनी केला.
या विलंबाबाबत त्यांनी प्रशासनावरही सवाल उपस्थित केला आहे. कायद्याने ठरवून दिलेल्या कालमर्यादा निवडणूक यंत्रणा व प्रशासनाने का पाळल्या नाहीत? या हलगर्जीपणाला नेमके कोण जबाबदार आहे, असा थेट प्रश्न अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात त्यांनी काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांची अंतिम मतदार यादी तातडीने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. या विलं


बाबाबत लेखी व सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे. जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कालबद्ध व पारदर्शक उपाययोजना जाहीर कराव्यात.
मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असल्याचे नमूद करत, या विषयाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी, अशी ठाम मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.




