पुणे : मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या विद्यमाने कला अकादमी, पणजी (गोवा) येथे ९, १० व ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘शोध मराठी मनाचा’ २१ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमांची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन युट्युबवर थेट (लाईव्ह) प्रक्षेपित केले जाणार आहे.
संमेलनाचे अध्यक्षपद पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर भूषविणार आहेत.
दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या सत्राने संमेलनास सुरुवात होईल. या सत्रात नामवंत अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांच्याशी ब्रिटीश नंदी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता ‘लक्ष्मीची पावले’ या सत्रात उद्योगपती अनिल खंवटे, भरत गीते (जर्मनी) व वैभव खांडगे (इंग्लंड) आपले विचार मांडतील.
सायंकाळी ४ वाजता ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा नाथ संस्थान ओसा यांचा चक्री भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरणाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत तसेच रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर सायंकाळी ७.३० वाजता नितीन कोरगावकर निर्मित ‘मर्मबंधातील ठे’ हा सावे श, साभिनय नाट्यगीत सादरीकरणाचा कार्यक्रम होईल.
दि. १० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘मांडवीच्या तीरावर’ हे गोव्यातील कवींचे कवीसंमेलन होणार असून अध्यक्षस्थानी प्रथितयश कवी डॉ. महेश केळुस्कर असतील.
दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ‘सुर संवाद चित्रफित’ या सत्रात किरण प्रधान (ऑस्ट्रेलिया) यांच्याशी नेपोलियन आल्मेदा संवाद साधतील. ‘आधारवड’ या सत्रात राम माणूस गावडे, कमलाकांत तारी व संदीप परब सहभागी होणार आहेत.
याच दिवशी ‘ट्रम्प ते पुतीन’ या जागतिक व्यवस्था व भारताशी संबंधित विषयावर चर्चासत्र होणार असून त्यात गिरीश ठकार (अमेरिका), अनिल आंबेस्कर, डॉ. किरण ठाकूर, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि वैशाली पतंगे आपले विचार मांडणार आहेत.
जागतिक स्तरावर मराठी भाषा, संस्कृती, विचार आणि कलेचा व्यापक शोध घेणारे हे संमेलन मराठी रसिकांसाठी वैचारिक व सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.




