मुंबई : धारावीतील के. एम. चौगुले चाळ, धारावी क्रॉस रोड, जी/उत्तर विभाग, वॉर्ड क्रमांक १८६ (मुंबई–४०००१७) येथील रहिवाशांनी येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर जाहीर निषेध नोंदवत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. चाळीत आजतागायत मूलभूत सुविधा, विशेषतः शौचालयांची व्यवस्था नसल्याने रहिवाशांना अमानुष परिस्थितीत जीवन जगावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारच्या “हर घर शौचालय” या धोरणाकडे आमदार, खासदार तसेच बीएमसी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. चौगुले चाळीत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात रहिवाशांनी अनेक वेळा महानगरपालिका, संबंधित वॉर्ड कार्यालय तसेच राजकीय प्रतिनिधींना निवेदने दिली, पत्रव्यवहार केला व प्रत्यक्ष भेटीही घेतल्या. विशेष म्हणजे ३ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लोकशाही दिनात चौगुले चाळीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन शौचालये बांधण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, मात्र तरीही आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, जी/उत्तर विभाग वॉर्ड क्रमांक १८६ मधील पालिका प्रशासन, वॉर्ड अधिकारी व परिक्षण विभागातील सहाय्यक अभियंते यांनी या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. सध्या नवीन डीआरपी (DRP) चा आधार पुढे करून प्रशासनाने चार शौचालये बांधण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, ही मागणी डीआरपी लागू होण्यापूर्वीपासून असल्याचे रहिवासी स्पष्ट करतात.
चाळीतील संपूर्ण रहिवाशांना एकही शौचालय नसताना, विरोध करणाऱ्या केवळ दोन व्यक्तींच्या कुटुंबासाठी दोन शौचालये उपलब्ध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “हा कुठला न्याय?” असा थेट सवाल रहिवाशांनी सरकार, राजकीय नेतेमंडळी व पालिका प्रशासनाला केला आहे.
या अन्यायामुळे चौगुले चाळीतील रहिवाशांवर गंभीर सामाजिक व मानवी संकट ओढावले असून, आम्हाला मूलभूत सुविधा मागण्याचा संविधानिक अधिकार आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तरीही सरकार, आमदार, खासदार व जी/उत्तर विभागाचे प्रशासन कोणाच्या दबावाखाली येऊन आम्हाला वंचित ठेवत आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध उच्चस्तरीय यंत्रणांकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
जोपर्यंत चौगुले चाळीतील रहिवाशांना किमान चार शौचालयांसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, तोपर्यंत येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर जाहीर निषेध करत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा चौगुले चाळीतील रहिवासी योगेश कांबळे, समीर शंकर व्हटकर यांनी दिला आहे.



