ताज्या बातम्या

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांनी राज्यात वाचन चळवळ राबवावी; माजी आमदार बाबुराव माने यांचे विश्वास पाटील यांना आवाहन

मुंबई — पुस्तके ग्रंथ,वृत्तपत्रे यासह सर्व साहित्याच्या वाचनाची गोडी मराठी समाजाला लागावी यासाठी अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यात वाचन चळवळ राबविली पाहिजे.यासाठी छोटे मोठे लेखक, पत्रकार, संपादक यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात कुशल वाचकांची संख्या वाढविण्यासाठी विश्वास पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत.तरच महाराष्ट्रात विविध प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे वाचणाऱ्या वाचकांची संख्या वाढेल असे मत महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबईचे अध्यक्ष आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी व्यक्त केले आहे.
सातारा नगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली.या पार्श्वभूमीवर बाबुराव माने यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना एक खुले पत्र लिहिलेले आहे.त्यात ही मागणी माने यांनी केली आहे.
बाबुराव माने म्हणाले आज आपल्या ज्ञानशक्तीचा पाया अत्यंत भुसभुशीत आहे.ज्ञानशक्ती ही वाचनाने समृध्द होते.पण आज एखाद्या शाळेत डोकावले तर अनेक शाळांत अनेक विद्यार्थ्यांना वाचावे कसे हे माहितच नाही.वाचन हे मनातले असो किंवा मोठ्या आवाजात एका लयीत केलेले वाचन असो.असे वाचन करणारे विद्यार्थी आणि अशा वाचनाचे धडे देणारे शिक्षक आपल्याला फार कमी दिसत आहेत.यासाठी वाचन चळवळ साहित्यिक, पत्रकार आणि संपादकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविली गेली तर नक्कीच या चळवळीस चांगले यश येईल. यासाठी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी छोटे मोठे लेखक, कवी इतर क्षेत्रातील तज्ज्ञांना बरोबर घेतल्यास महाराष्ट्रात नक्कीच वाचन चळवळ समृध्द होईल असे मला वाटते.
वाचनाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागते.त्यांचा आत्मविश्वास वाढतो.आणि आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे वाचन करण्याची क्षमता,ताकद आहे अशी जाणीव मुलांना होत राहते.ही मुलेच ही आपल्या उद्याच्या भारताची संपत्ती असल्याने शाळा शाळांत रोज एक तासिका ही मोठ्याने वाचन करण्याची ठेवावी.यातून आपल्याला शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर मोठ्या वाचायचे आहे असे मनात बिंबवले गेली की ही मुले घरुनच वाचनाचा सराव करुनच रोज शाळेत येतील.हे वाचन फिरते ठेवावे.पहिल्या दिवशी आठ- दहा विद्यार्थी एखाद्या धड्याचे वाचन करतील.दुसर्‍या दिवशीच्या तासिकेला दुसरे आठ – दहा विद्यार्थी दुसर्‍या धड्याचे वाचन करतील.हा उपक्रम पहिली ते दहावीपर्यंत प्रत्येक शाळेत राबवला गेला तर महाराष्ट्रात कुशलतेने वाचन करणाऱ्या तरुणांची एक फौज निर्माण होईल असा मला विश्वास वाटत असल्याचे बाबुराव माने यांनी म्हटलेले आहे.ही वाचन चळवळ आपण महाराष्ट्रात उद्या सुरु केली तर संपूर्ण महाराष्ट्र हा आपल्या पाठिशी नक्कीच उभा राहील असेही बाबुराव माने यांनी विश्वास पाटील यांना आवाहन करताना या खुल्या पत्रात म्हटलेले आहे. यासंदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री एकूणच सरकारचीही मदत यासंदर्भात घेतली पाहिजे.आणि सरकारनेही अशी वाचन चळवळीस पाठबळ दिले तर नक्कीच उद्याचा महाराष्ट्र हा अधिक बलवान झालेला दिसेल अशी मला आशा असल्याचेही बाबुराव माने यांनी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांना पाठवलेल्या या खुल्या पत्रात नमूद केलेले आहे.
आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती ऑक्टोबर मध्ये वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते.निश्चितच हा उपक्रम चांगला आहे.परंतु या महाराष्ट्रातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी असे वाचन प्रेरणादिन प्रत्येक तासिकेला साजरे झाले तरच मोबाईल स्क्रीनकडे वळलेली पिढी ही वर्तमानपत्रे, पुस्तके वाचनाकडे नक्कीच वळेल असेही बाबुराव माने यांनी माननीय संमेलनाध्यक्षांना आवाहन करताना शेवटी म्हटलेले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top