कुडाळ(अजित जगताप) : सध्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीनंतर आता जावळी सातारा विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये कुडाळ जिल्हा परिषद गटात इतर मागासवर्गीय महिलांसाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे . या परिवर्तनाच्या लाटेच्या स्वागतासाठी मतदार सुद्धा तयारी करू लागलेली आहेत.
सातारा जिल्हा परिषदेमधील जावळी तालुक्यातील कुडाळ जि प गटात उच्चविद्याविभूषित व इतर मागासवर्गीय चळवळीशी असलेली नाळ असणाऱ्या कर्तबगार महिलेला संधी द्यावी. अशी मागणी आता खेड्यापाड्यातून आघाडी व महायुतीतून सुरू झालेली आहे. इतर मागासवर्गीय समाजामधील महिलांसोबतच कुणबी मराठा दाखला असलेल्या महिलांनाही अर्ज करून आपले नशीब आजमावले तर त्यात काही वावग नाही. असा आता सूर मिटत आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गट, कुडाळ व सायगांव पंचायत समिती गण आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असल्यामुळे भाजप – शिवसेनेला फार शिरकाव करता आला नाही. पण आता राष्ट्रवादीच्याच काही नेते व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता या ठिकाणी कमळ की तुतारी याच प्रश्नाचे उत्तर सापडणार आहे. भविष्यात आडवी तिडवी आघाडी- युती झाली तर कार्यक्षम व सक्षम महिलेला संधी मिळेल. अशी आशा मतदारांना वाटत आहे. त्याचीच सध्या गोपनीय रित्या चाचणी सुरू आहे.
कुडाळ हा जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या गटाचं राजकीय महत्त्व वाढले आहे. असले तरी कुडाळ सारख्या बाजारपेठ असलेल्या गावात दोन ठिकाणी उमेदवारी मिळणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या कुडाळ जिल्हा परिषद गट व कुडाळ पंचायत समिती इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तुम्ही मला सहकार्य करा. मी तुम्हाला सहकार्य करतो. असा राजकीय वारुंगुळा काहींचा झाला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हात दाखवून आपली शोभा होऊ नये. मताची टक्केवारी टिकवण्यासाठी काही वेळेला राजकीय बळी द्यावे लागतात.यासाठी काहीनी सावध भूमिका घेतली आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक ३७ आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या ३५,४११ आहे. तर, कुडाळ पंचायत समिती गणाची मतदारसंख्या १६,१८९ इतकी आहे. सायगांव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या १९,२२२ इतकी आहे. साठ ते सत्तर टक्के मतदान गृहीत धरले तर कुडाळच्या युवा नेत्यांच्या समवेत सायगाव भागातील भाजप नेत्यांचाही करिष्मा उपयुक्त ठरणार आहे.
कुडाळ जिल्हा परिषदेसाठी आत्तापर्यंत अधिकृतरित्या अथवा मेळाव्याच्या माध्यमातून कुणीही आपली उमेदवारी जाहीर केली नाही. तरीसुद्धा ऐन वेळेला चार ते पाच उमेदवार निवडणुकीत असतील असे गृहीत धरून बाधणी करण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा यासाठी खूप मोठी रसद पुरवण्याची तयारी केलेली आहे. स्थानिक पातळीवर बैठका होत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंहरजे भोसले
, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे, मुत्सदी राजकारणी वसंतराव मानकूमरे आणि सौरभ राजेंद्र शिंदे या चौकडीच्या विचार विनिमयानुसार उमेदवारी जाहीर होणार आहे.
कुडाळ पंचायत समिती गणातील गावे (सर्वसाधारण)कुडाळ, सरजापूर, सरताळे, आर्डे, सोनगाव, बेलवडे मरडमुरा, पानस. पु. , सांगवी तर्फ कुडाळ, बामणोली तर्फे कुडाळ, भिवडी,
सायगांव पंचायत समिती गणातील गावे ( सर्वसाधारण महिला)जवळवाडी, आगलावेवाडी, बिभवी, रिटकवली, ओझरे, भणंग, कुंभारगणी, केसकरवाडी, वाघेश्वर, केंजळ, मोरावळे, नरफदेव, मोरघर, धनगरपेठा, महिंगाव, प्रभुचीवाडी, दुदुस्करवाडी, दरे खु. , जवळेवाडी, मोरेवाडी, पवारवाडी, सायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, रायगांव, महामुलकरवाडी, आनेवाडी गावे असून काही महत्त्वाच्या गावामध्ये सध्या इतर मागासवर्गीय महिलांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झालेले आहे. महिला उमेदवार सुशिक्षित व इतर मागासवर्गीय चळवळी सोबतच भाजपशी नाळ असणारेच उमेदवार असतील असे आता भाजपमधून छातीठोकपणाने सांगण्यात येत असल्याने अनेकांचे बाशिंग गळून पडणार असल्याचे दिसून येत आहे.
चौकट —
कुडाळ जिल्हा परिषद (जि.प.) गटात कर्तबगार इतर मागासवर्गीय महिलांना तसेच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे हे स्थानिक राजकारण आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यात नवीन उमेदवारांना निवडून येण्याची शक्यता, जुन्यांच्या विरोधात नाराजी आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे तरुणांना आणि नव्या विचारांना प्रतिनिधित्व मिळू शकते. याबाबत राजकीय गोटात सुद्धा विचार सुरू झालेले आहे. ही चांगली लक्षणे आहेत.
नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची कारणे बरीच आहेत.
स्थानिक असंतोष वाढत आहे.जुन्या लोकप्रतिनिधींविरुद्ध लोकांमध्ये नाराजी असल्यास, नवीन उमेदवारांना पाठिंबा मिळतो.
तरुणांचा सहभाग वाढत आहे. वाढत्या वयामुळे किंवा निष्क्रियतेमुळे जुन्या नेतृत्वाकडून तरुण पिढीला संधी देण्याची मागणी होणे व्यवहारीक आहे. तेच तेच चेहरे पाहून विकासाला खिळ बसत आहे हे सिद्ध झाले आहे. नवीन चेहरे स्थानिक समस्यांवर नवीन उपाय आणि विकासाचे दृष्टिकोन आणू शकतात.
राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे प्रत्येकाला आपल्या गटाचे अस्तित्व राखून नेत्याची मर्जी सांभाळावी लागते. पक्षांमध्येही नवीन नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची किंवा गटबाजीमुळे जुन्यांना डावलण्याची प्रवृत्ती असू शकते.
कुडाळ जि.प. गटात निवडणुका जवळ आल्या असतानाच नवीन उमेदवारांची चर्चा ही जातीय समीकरणापेक्षाही गुणवत्तेवर होत आहे.
सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तपत्रांमधून नवीन उमेदवारांबद्दल बातम्या येऊ शकतात, जे सध्याच्या परिस्थितीवर मराठा क्रांती मोर्चा व इतर मागासवर्गीय समाजाला समसमान प्रतिनिधित्व देणाऱ्यांबद्दल भाष्य करतील. त्यांनाच वाढता पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




