सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणाने सातारची ओळख अतिक्रमणाच्या विळख्यातील शहर अशी बनवली गेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम परिसरातील अतिक्रमण कुलूप बंद झाले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा ठेवणाऱ्या नागरिकांनी संमेलनाच्या आयोजकांचे मनापासून आभार मानले आहेत. संमेलन संपल्यानंतर हे कुलूप उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे जिल्हा प्रशासन व नगरपालिकेचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
याबाबत माहिती अशी की ,सातारा नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याने प्रशासकीय कारभार सुरू होता. आता संपूर्ण नगरपालिका राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आल्यामुळे सर्वसामान्य माणसांना अच्छे दिन नको पण अतिक्रमण मुक्त सातारा एवढीच माफक अपेक्षा होती. ती फोल ठरलेली आहे. सातारा नगरपालिकेचे आता अतिक्रमणाचे समर्थन करणारे मसीहा निवडून आल्यामुळे सामान्य माणसांना फुटपाथ शोधणे अवघड झाले आहे. सातारा बस स्थानक परिसरात तसेच नाक्याभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळे आहे .तरी सातारा नगरपालिका अतिक्रमण विभाग गांधारीची भूमिका सोडण्यास तयार नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक जण सातारा शहराला भेट देत आहेत. अशा वेळेला सातारा नगरपालिकेची अब्रू चव्हाट्यावर जाऊ नये. यासाठी अतिक्रमणवाल्यांनाच विनंती करून त्यांची दुकानदारी बंद करण्यास लावण्यात आली आहे. या अतिक्रमणातून मोठे अर्थकारण होत असले तरी या अतिक्रमणाच्या माध्यमातून काही बेरोजगार व प्रामाणिक व्यवसाय करणारे ही व्यवसायिक आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन मानवता भावनेतून झालेच पाहिजे. याबद्दल कुणाची ही दुमत नाही. परंतु, काही अतिक्रमण धारक दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूला प्रशासकीय व लोकप्रतिनिधी समर्थक हप्ते खोरी आणि दुसऱ्या बाजूला गुंडांना खंडणी देऊन तिसरा भाग हा उपजीविकेसाठी वापरावा लागत आहे. याबद्दल आता सामुदायिकरित्या आवाज उठवणे गरजेचे आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संयोजकांनी खूप मोठी चांगली भूमिका अदा केली आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सत्व साजरा करणारे मूग गिळून गप्पगार पडले आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस अच्छे दिन आल्यामुळे ही किमया फक्त मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी केली आहे. त्यामुळे त्यांचे शांतता प्रिय नागरिकांनी आभार मानलेले आहेत. आता सातारा नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी हिम्मत असेल तर आपल्या प्रभागातील अतिक्रमण दूर व्हावे. यासाठी सभागृहात आवाज उठवला तर काहींना निवडणुकीत दारू व पैसा वाटून तसेच दहशत माजवून निवडून येण्याची गरज भासणार नाही. असे राजकीय निरीक्षक व निवडणूक अभ्यासकांनी सांगितले.
_____________
चौकट – सातारा शहरांमध्ये राज्याचे नेतृत्व करणारे तीन मंत्री व दोन खासदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राहत आहेत . त्यांच्याकडे अनेकदा सातारा शहरातील अतिक्रमणाबाबत तक्रारी झालेल्या आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी राखणाऱ्या काही वृत्तपत्राने ही मालिका लिहिलेले आहेत. तरीसुद्धा अतिक्रमण काढता येत नाही. ही खरं म्हणजे सातारकरांची शोकांतिका आहे. यापेक्षा बिहार मधील पटना बरे असं म्हणण्याची वेळ आली आहे.
______________________
फोटो सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे कुलूप बंद झालेले अतिक्रमण (छाया- अजित जगताप, सातारा)




