ताज्या बातम्या

धारावीतील संत कक्कया–संत रोहिदास मार्गावरील बेकायदेशीर कचराकुंडी तात्काळ हटवण्याची मागणी

मुंबई : धारावीतील संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग यांना छेद देणाऱ्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कचराकुंडीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भर बाजार रस्त्यावर असलेल्या या कचराकुंडीमुळे भाजीपाला मार्केटसमोरील दुकाने तसेच उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ रोजच घाणीच्या संपर्कात येत आहेत.
या परिसरात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. मात्र वेळेत कचऱ्याची विल्हेवाट न लागल्याने भटकी कुत्री हा कचरा सर्वत्र पसरवतात. त्यामुळे नागरिकांना या घाणीतून वाट काढत, कुत्र्यांपासून सावध राहून प्रवास करावा लागत आहे. परिणामी अपघात, संसर्गजन्य आजार आणि दुर्गंधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित बेकायदेशीर कचराकुंडी कायमस्वरूपी बंद करावी, तसेच पर्यायी स्वच्छ व नियोजित कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव श्री. दिलीप गाडेकर यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या प्रश्नावर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top