ताज्या बातम्या

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांचा राजीनामा; नव्या अध्यक्षाची उत्सुकता

मुंबई : रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा म्हणून गेली पाच वर्षे जबाबदारी निभावत असलेल्या श्रीमती अश्विनी प्रदीपकुमार महांगडे यांनी आज(७ डिसेंबर) आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा सादर केला. प्रतिष्ठानच्या नियमावलीनुसार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदी बदल आवश्यक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे दिली.

वैयक्तिक कारणांमुळे पुढील कामकाज सांभाळणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रतिष्ठानशी संबंधित कागदपत्रे, बँक खाते नोंदी व पत्त्यातून नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजीनाम्यासोबत दिलेल्या भावनिक निवेदनात महांगडे म्हणाल्या,
“रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे नाव माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानने दिलेल्या अनुभवांमुळे माझी ओळख अधिक भक्कम झाली. पद सोडले म्हणजे काम संपले असे नाही; या पाच वर्षांच्या आठवणी आणि अनुभव पुढील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतील.”

तसेच त्यांनी सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत पुढील अध्यक्षाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
“या प्रवासात मेहनत करणारे माझ्या सोबतचे सर्व हात होते. मला सांभाळून घेतल्याबद्दल मी प्रतिष्ठानची कायम ऋणी राहीन.” असे त्या म्हणाल्या.

अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे संस्थेमध्ये नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत सदस्यांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. लवकरच निवड प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असून प्रतिष्ठानमध्ये आगामी नेतृत्वाबाबत चर्चा सुरू आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top