मुंबई(सदानंद खोपकर) : “आता गवत नुसतेच हिरवे दिसते, आभाळ नुसतेच निळे…” अशा सहज, तरल आणि मनामनाला भिडणाऱ्या ओळींच्या माध्यमातून मराठी मनांवर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणाऱ्या प्रख्यात कवयित्री, गीतकार आणि साहित्यिक प्रा. शांता शेळके यांची आज २३ वी पुण्यतिथी आहे. १२ ऑक्टोबर १९२२ रोजी जन्मलेल्या शांताबाईंनी आपल्या लेखनकौशल्यातून मराठी साहित्यात एक अमिट ठसा उमटविला.
साहित्य, शिक्षण आणि संस्कृती या त्रिसूत्रीला अनुसरून त्यांनी कविता, गीतलेखन, कादंबरी, अनुवाद व बालसाहित्य या सर्वच क्षेत्रांत सक्रीय योगदान दिले. वर्षारूपसी, तोच चंद्रमा, गोंदण, अनोळखी, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती यांसारख्या काव्यसंग्रहांमधून त्यांनी स्त्रीच्या अनुभवविश्वाला सशक्त आवाज दिला. त्याचप्रमाणे विझलेली ज्योत, नरराक्षस, पुनर्जन्म, स्वनतरंग या कादंबऱ्यांमधून सामाजिक प्रश्नांवर प्रगल्भ दृष्टिकोन प्रस्तुत केला.
विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचा वाटा उचललेल्या शांताबाईंनी आपल्या अध्यापनकार्याद्वारेही हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. कविता करणारा कावळा सारख्या बालसाहित्याच्या माध्यमातून त्यांनी लहान वाचकांनाही संवेदनशील साहित्याची ओळख करून दिली. त्यांनी अनेक परदेशी साहित्यकृतींचे सुसंवादी मराठी अनुवादही केले.
१९९६ मध्ये आळंदीत पार पडलेल्या ६९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या लेखणीतून साकारलेले गीत “असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे…” हे आजही रसिकांच्या ओठांवर राहते, आणि त्यांच्या स्मृतींना जिवंत ठेवते.
प्रा. शांता शेळके यांचे साहित्य हे मराठी संस्कृतीचा एक अभिन्न भाग असून, त्यांचा साहित्यिक वारसा आजही नवे वाट शोधणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे.