ताज्या बातम्या

नागरी संरक्षण दलाच्या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा कोपरखैरणेत समारोप

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील एफ. जी. नाईक महाविद्यालयात नागरी संरक्षण दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी उत्साहात समारोप झाला. ठाणे जिल्हा उपनियंत्रक विजयजी जाधव यांच्या आदेशान्वये सोमवार, दि. २४ ऑगस्टपासून या प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली होती.
ठाणे जिल्हा उपनियंत्रक विजयजी जाधव यांच्या आदेशान्वये तसेच सहाय्यक नियंत्रक अनिलजी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणादरम्यान मानवी जीवनावर उद्भवणाऱ्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या काळात स्वतःचा बचाव करण्यासोबतच इतरांचे प्राण वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने मदतकार्य करावे, याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी गेस्ट लेक्चरर म्हणून डॉ. राहुल घाटवाळ तसेच प्रकाश ठमके यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ निर्णय घेणे, बचावकार्याची प्राथमिक माहिती, सुरक्षितता उपाययोजना आणि नागरिकांनी बजावायची भूमिका याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून समारोपाच्या दिवसापर्यंत विभागीय क्षेत्ररक्षक अरुण सातपुते आणि स्वयंसेवक रमेश संकपाळ यांनी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे कामकाज पाहिले.
नवी मुंबई परिसरातील ७० प्रशिक्षणार्थींनी या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जागरूकता, स्वयंरक्षणाची क्षमता आणि संकटसमयी इतरांना मदत करण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले.

Scroll to Top