ताज्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आशियाई पदकविजेत्या श्रीशा जाधवचे कौतुक

कराड : आशियाई स्तरावर कांस्यपदक पटकावत कराड, सातारा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारी कु. श्रीशा सागर जाधव ही राज्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या श्रीशाने आपल्या कुटुंबीयांसह आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्यासमवेत कराड येथील निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीशाचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडसारख्या शहरातील एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा नसतानाही श्रीशाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा खेळाडूंना शासन, क्रीडा संस्था आणि समाजाने अधिकाधिक पाठबळ देण्याची गरज आहे. भविष्यात श्रीशा आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून भारताचा तिरंगा उंचावेल, असा मला विश्वास आहे.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी स्केटिंगला सुरुवात केलेल्या श्रीशाने कराड येथील योगेश स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. रोलर स्केटिंग आणि रोलबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर तिची वाटचाल आईस स्केटिंगकडे वळली. महाराष्ट्रात या खेळासाठी आवश्यक सुविधा नसतानाही तिने देहरादून येथे प्रशिक्षण घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली.

श्रीशाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. नियमित सरावाचे मैदान बंद झाल्यानंतर तिने कराडमधील डांबरी रस्त्यांवर सराव सुरू ठेवला. कब्रस्तान परिसरातील रस्ता आणि वॉटर हाऊस परिसरातील रस्त्यांवर दररोज तासन्तास सराव करत तिने आपली तयारी कायम ठेवली. अत्याधुनिक सुविधा नसतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले आणि त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवले.

१७ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत ११ वर्षांखालील ३३३ मीटर गटात कांस्यपदक पटकावत श्रीशाने ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या यशामागे आई कल्याणी जाधव, वडील सागर जाधव, आजी अरुणाताई जाधव यांचा पाठिंबा आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
डांबरी रस्त्यावरच्या सरावातून आशियाई पदकापर्यंत पोहोचलेली श्रीशा जाधव आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.

Scroll to Top