कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : पाचवड फाटा येथून कॉपर चोरणाऱ्या टोळीला कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले कॉपर असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली असून एका फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
सुनिल ताराचंद चव्हाण (वय २८, रा. सुंदरनगर उत्तर पार्ले, ता. कराड), निखील उमाजी बुधावले (वय २३, रा. बुधावलेवाडी पो. विसापूर, ता. खटाव), साहिल नितीन जाधव (वय २१), विक्रम भानुदास जाधव (वय २२, दोघेही रा. गांववाडी, पो. विसापूर, ता. खटाव) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचवड फाटा येथून महिन्याभरापूर्वी ओम इंडस्ट्रीज वर्कशॉपमधून कॉपर चोरीस गेले होते. त्याचा कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा सुंदरनगर पार्ले येथे येणार आहे. पोलिसांनी पार्ले येथे सापळा रचून सुनिल चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपासणी केली असता त्याचे बाकीचे साथीदार विसापूर येथे असल्याचे
सांगितले. पोलिसांनी विसापूर येथून तिघांना ताब्यात घेतले. तर सदर गुन्ह्यातील आणखी एक संशयित आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांकडून चोरीस गेलेला सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, सागर शिवदास, किरण बामणे, प्रफुल्ल गाडे, मयुर देशमुख यांनी केली.




