कराड( ज्ञानेश्वर शेवाळे) : कराड शहरातील मोहिते हॉस्पिटलच्या शेजारी असणाऱ्या मध्यवर्ती भागात असलेल्या एस. एस. मोबाईल शॉपीवर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना घडली. चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी दुकान फोडून 60 लाख रुपये किमतीचे तब्बल 300 मोबाईल फोन लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून काही चोरटे एस. एस. मोबाईल शॉपीजवळ आले. त्यांनी दुकानाचे शटर व इतर सुरक्षा व्यवस्था तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील मोठ्या संख्येने मोबाईल फोन घेऊन चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच डी. वाय.एस.पी. राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुकान तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांनी वापरलेल्या स्विफ्ट चारचाकी वाहनाची माहिती मिळविण्यासाठीही पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील तसेच शहराबाहेरील संभाव्य मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कराड शहर पोलीस करीत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.




