ताज्या बातम्या

उंडाळे–सवादे कॉर्नर मार्गावर रस्त्यातच लोखंडी डांब; सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद बांधकाम विभाग? नागरिकांचा संतप्त सवाल

कराड(प्रताप भणगे) : उंडाळे ते सवादे कॉर्नर मार्गावर रस्त्याच्या मध्यभागीच लोखंडी डांब उभे करण्यात आल्याने वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे लोखंडी डांब वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांना अचानक दिशा बदलावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे की जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्यात उभे असलेले लोखंडी डांब त्वरित हटवावेत किंवा त्या ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, रिफ्लेक्टर व आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन हा धोकादायक अडथळा दूर करावा आणि संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Scroll to Top