कराड : कराड तालुक्यातील वारुंजी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने हा परिसर अक्षरशः कचऱ्याचा अड्डा बनला आहे. रस्त्याच्या कडेला तसेच परिसरात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिक व वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
फाट्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ असते. मात्र, कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांचा कचरा यासह विविध प्रकारचा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्वच्छ भारत अभियान आणि गावागावांत स्वच्छतेचा संदेश दिला जात असताना वारुंजी फाट्याची ही अवस्था प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कचरा उचलण्यासाठी नियमित व्यवस्था करावी तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वारुंजी फाटा कचरामुक्त करून परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




