कराड(प्रताप भणगे) : कराडच्या नवीन पुलावर दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून प्रवासी चढवले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूध वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्यास हा प्रकार गंभीर असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
नवीन पुलावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी दूध टँकर रस्त्यावर थांबवून प्रवाशांना चढवणे-उतरणे धोकादायक ठरू शकते. टँकरमागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागल्यास अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्याही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कराडमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पूल महत्त्वाचा मार्ग ठरत आहे. मात्र, याच पुलावर नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक नियमांची अंमलबजावणी नेमकी कुठे आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकाराची वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




